उद्दिष्ट पूर्ती : वसुलीचे काम जोमात भंडारा : आर्थिक वर्ष संपायला काही दिवसच शिल्लक आहेत. मात्र, वसुली टार्गेट लाखोंच्या घरात असल्याने शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांवर मानसिक दडपण आले आहे. थकीत टॅक्सधारक व कर्जधारकांचे बजेट पूर्णत: कोलमडले आहे. त्यामुळे 'मार्च एन्डिंग' चा वसुली कर्मचारी व थकीत करधारकांनी धसका घेतला आहे. जिल्ह्यात महसूल विभाग, महावितरण, पोलीस प्रशासन, नगरपंचायत, ग्रामपंचायत, दूरसंचार विभाग, कृषी विभाग, स्टेट बँक, सेंट्रल बँक, ग्रामीण क्षेत्रिय बँक, विविध पतसंस्था अशा शासकीय, अशासकीय कार्यालयांतर्गत हजारो नागरिकांकडे विविध स्वरुपाचा कर थकीत असल्याचे निदर्शनास येत आहे. महसूल व पोलीस विभागाला मार्च एन्डिंगचे टार्गेट पूर्ण करावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ आले आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील नगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी फिरुन वसुली करीत आहेत. विविध प्रकारची वसुली टार्गेट पूर्ण करीत असताना कर, थकीत वीजबिल, थकीत कर्ज एकाचवेळी भरावे लागत असल्याने नागरिकांवर देखील ताण येत आहे. थकीत करवसुलीकडे वर्षभर लक्ष न देणारे कर्मचारी आर्थिक वर्षाच्या अखेरीस वसुलीवर जोर देतात, असे चित्र आहे. महसूल प्रशासनाला मोठे टार्गेट असून पोलीस विभागाला सुध्दा लाखोंचे लक्ष्य देण्यात आले आहे. महावितरण्ची सुध्दा नागरिकांकडे लाखो रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी मार्च महिना संपण्यापूर्वी वसूल करण्याची मोठी कसरत कर्मचारी, अधिकाऱ्यांना करावी लागत आहे. त्यामुळे सर्वच कर्मचारी तणावग्रस्त असल्याचे एकूण चित्र पाहायला मिळत आहे. (प्रतिनिधी)
‘मार्च एन्डिंग’च्या ‘टार्गेट’मुळे कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला
By admin | Updated: March 16, 2016 08:30 IST