चांदूरची बाजारपेठ बंद : पोलिसांवर दगडफेक, खरवाडीत पोलिसांचा गराडासुमित हरकुट चांदूरबाजारअनियंत्रित ट्रकने घडविलेल्या १२ वाहनांच्या अपघात मालिकेनंतर चांदूरबाजार, खेड, उदखेड, कोळविहीर आणि खरवाडीवासीयांच्या संतापाचा भडका उडाला. ट्रक जाळून आणि चालकाची मनसोक्त धुलाई करुन संतप्त नागरिकांना राग शांत करायचा होता; तथापि पोलिसांनी ट्रकभोवती सशस्त्र गराडा घातल्याने गावकऱ्यांचा नाईलाज झाला. पोलिसांवर दगडफेक करुन नागरिकांनी संतापाला थोडी का होईना, वाट मोकळी करुन दिली. वृत्त लिहिस्तोवर खरवाडीत तणावपूर्ण स्थिती होती. चांदूरबाजारची मुख्य बाजारपेठ रात्री ८ वाजताचा बंद करण्यात आली होती. चांदूरबाजार ते अमरावती मार्गावर कार, बस, सायकल, दुचाकी अशा १२ वाहनांना धडक देत ट्रक निदर्यीपणे अमरावतीच्या दिशेने सुसाट वेगाने दामटला जात होता. अपघातग्रस्तांची स्थिती बघून नागरिकांचा संताप अनावर होत होेता. ट्रकमध्ये चालक आणि दोन क्लिनर होते. यमदूत बनून धावू लागलेला ट्रक रोखणे अत्यंत महत्त्वाचे झाले होते. काही नागरिकांनी ट्रकचा पाठलाग केला. कुणालाही न जुमानता चालक ट्रक पळवत राहिला. चांदूरबाजारमधून शेकडो लोकांचा लोंढा ट्रकच्या मागे निघाला होता. खरवाडी गावात ट्रक रोखला गेला. नागरिकांनी ट्रकची तोडफोड सुरु केली. नेहमीच घटनेनंतर पोहचणारे पोलीस यावेळीही १२ अपघात झाल्यानंतर आणि नागरिकांनी ट्रक अडविल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले. चांदूरबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय आखरे हे पोलीस ताफ्यासह पोहचले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच घामाझोकळ झालेल्या ठाणेदारांनी तत्काळ अतिरिक्त पोलीस कुमक मागविली. शिरजगाव, ब्राम्हणवाडा थडी, परतवाडा, आसेगाव, शिरखेड व मोर्शी ठाण्यातील पोलिसांचा अतिरिक्त ताफा आणि राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी घटनास्थळी मदतीसाठी पोहचली. जनावरांच्या अवैध वाहतुकीतून उद्भवलेला हा प्रसंग खरे तर आतापर्यंतच्या अनेक छोटया-मोठया प्रसंगाचे विक्राळ रुप होता. नागरिकांनी ट्रक चालकाविरुध्द जसा संताप व्यक्त केला तसाच तीव्र संताप त्यांनी पोलिसांविरुध्दही व्यक्त केला. पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे सामान्य नगारिकांना नाहक जीव गमवावे लागतात ही भावना चांदूर बाजारवासियांना राहून-राहून अस्वस्थ करीत होती. म्हणूनच पोलिसांचा लाठीमार होवूनही जमाव पुन्हा-पुन्हा ट्रकभोवती जमू पाहत होता. पोलिसांवर झालेली दगडफेक याच भावनेतून घडली.संताप अन् संवेदनशीलता अपघाताच्या भीषण मालिकेनंतर ट्रक चालकाच्या जिवावर उठलेल्या नागरिकांनी त्याचवेळी संवेदनशील आणि मृदु मनाचा परिचय दिला. ट्रकमध्ये गायी असल्याचे आणि त्या गंभीर जखमी झाल्याचे लक्षात येताच संतप्त नागरिकांनी जखमी गायींची संवेदनशीलपणे चारापाण्याची व्यवस्था केली. मृत गायींना योग्य पध्दतीने सुरक्षीतस्थळी हलविण्यात आले.
अपघात मालिकेनंतर संतापाचा भडका
By admin | Updated: July 20, 2016 23:53 IST