वीज कंत्राटी कर्मचारी प्रलंबित मागण्यासाठी बेमुदत संपावर

By उज्वल भालेकर | Published: March 5, 2024 06:23 PM2024-03-05T18:23:58+5:302024-03-05T18:24:20+5:30

महावितरण परिमंडळ कार्यालयासमोर सरकारविरोधात निदर्शने

Electricity contract workers on indefinite strike for pending demand | वीज कंत्राटी कर्मचारी प्रलंबित मागण्यासाठी बेमुदत संपावर

वीज कंत्राटी कर्मचारी प्रलंबित मागण्यासाठी बेमुदत संपावर

अमरावती: कंत्राटी वीज कामगारांना सेवेत कायम करा, या प्रमुख मागणीसह कर्मचाऱ्यांच्या इतर विविध प्रलंबित मागण्यासाठी मंगळवार दि.५ मार्चपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरु केला आहे. त्यामुळे महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तीनही कंपन्यांच्या सेवेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत संप सुरुच ठेवण्याच्या भूमिकेवर कर्मचारी ठाम आहेत.शहरातील महावितरण परिमंडळ कार्यालयासमोर कंत्राटी कामगारांनी निदर्शने करत सरकारचा निषेध नोंदविला. 

महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तीन्ही वीज कंपन्यामध्ये मागील १५ ते २० वर्षापासून कंत्राटी कामगार काम करत आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्या अनेक संघटनांच्या माध्यमातून शासन आणि प्रशासनापुढे मांडल्या आहेत. मात्र या कामगारांच्या मागण्याकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे या तीनही वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनांनी एकत्र येत संयुक्त कृती समिती स्थापन केली आहे. कर्मचाऱ्यांच्या हिताचा अध्यादेश जारी करण्यासाठी या संघटनेने पाच दिवसांची मुदत दिली हाेती.

मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने या कर्मचाऱ्यांनी अखेर बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. जिल्ह्यातील महापारेषण आणि महावितरण या दोन कंपन्यामध्ये तीनशे ते साडेतीनशेच्या जवळपास कंत्राटी कामगार असून पहिल्या दिवशी संपात १०० ते १२० कामगार सहभागी झाले होते. कामगारांच्या यासंपाला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन,वीज कामगार महासंघ, इंटक, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, सर्बोर्डिनेट इंजिनियर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी मागासवर्गीय संघटन या सहा संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

Web Title: Electricity contract workers on indefinite strike for pending demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.