समायोजित रक्कम लागू : दिवाळीच्या तोंडावर महावितरणाचा शॉक वैभव बाबरेकर अमरावतीसमायोजित रकमेसह युनिटची रक्कम वाढवून महावितरणने दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांना शॉक दिला आहे. त्यातच युनिटसंदर्भातद २०१४ मध्ये छापलेली माहिती आजही बिलामागे तशीच ठेवल्याने नागरिकांचा गोंधळ उडाला आहे. बिल वाढल्याची तक्रारी घेऊन दररोज शेकडो ग्राहक वीज वितरणाकडे धाव घेत आहे. महावितरणाचे शहरात सुमारे दीड लाख ग्राहक आहेत. तीन महिन्यांपासून बिल वाढीसंदर्भात ओरड होत आहे. अचानक जून महिन्यापासून बिलाची रक्कम वाढल्याने नागरिकांची ताराबंळ उडाली. सामान्य जनतेसह श्रींमतांनाही वीजभार सोसावा लागत आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने १ जूनपासून नवीन वीजदर लागू केले. त्यामध्ये नवीन दराप्रमाणे समायोजित रक्कम महिन्याच्या देयकांमध्ये समाविष्ट केली आहे. दरमहिन्याला सर्वसाधारण वीज बिलाचे नियोजन नागरिकांकडून केले जाते. मात्र, अचानक वाढलेल्या बिलामुळे दिवाळीच्या तोंडावर नागरिकांना अधिक रक्कम भरावी लागत आहे. वीज नियामक आयोगाने एप्रिल २०१४ मध्ये निर्धारित केलेले वीज दर आजही दरमहिन्याच्या बिलामागे दिसून येत आहे. २०१५ लागून १० महिने ओलांडले आहेत. मात्र, बिलामागील युनिटचे दर तसेच असल्यामुळे महावितरण कंपनी नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. तीन महिन्यापासून दरमहिन्याच्या बिलात वाढ झाल्याचे ग्राहकांच्या लक्षात आले आहे. मात्र, आपलाच वीज वापर अधिक झाला असावा असा, समज ग्राहकांचा झाला आहे. मात्र, वीजदरवाढ होऊनही महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी चुप्पी साधली आहे. वीज वापरात काळजी घ्यावीज बचत ही काळाची गरज असून नागरिकांनी याबाबत नियोजन केले पाहिजे. अनावश्यक विजेचा वापर टाळावा, एलईडी लाईटचा उपयोग करा, विजेचे नियोजन करा, घरातील वायरिंगची तपासणी करून घ्या, अर्थिंगची नीट पाहणी करा, वीज वाचविणारी उपकरणे वापरा, निकृष्ट दर्जाचे उपकरणे वापरू नका, असे आवाहन वीज महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. समायोजित रक्कम काय आहे ?महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने १ जून २०१५ रोजी वीजदर लागू केले. तेव्हापासून तर आता आॅक्टोबर महिन्यादरम्यान वीज बिलातील युनिटमधील तफावत म्हणजे समायोजित रक्कम आहे. ही रक्कम जून महिन्यापासून न लावता आॅक्टोबर महिन्यापासून बिलात लागून आली आहे. अधीक्षक अभियंता म्हणतात आॅक्टोबर हीटचा प्रभावशहरातील बहुतांश ग्राहकांच्या बिलाच्या रकमेत वाढ झाल्याबाबत लोकमत प्रतिनिधी महावितरणाच्या अमरावती विभागाचे अधीक्षक अंभियंता दिलीप घुगल यांच्याकडे गेले होते. मात्र, त्यांनी बिले वाढण्यास आॅक्टोबर हीट कारणाभुत असल्याचे सांगितले. आॅक्टोबर हिटमुळे ग्राहकांनी विजेचा वापर अधिक प्रमाणात केला, ही बाब खरी आहे. मात्र, वीज युनिटमागे रक्कमसुध्दा वाढली आहे. मात्र ही बाब त्यांनी उघड केली नाही.
वीज बिल नव्या दराने युनिटची माहिती जुनीच
By admin | Updated: November 10, 2015 00:32 IST