दिवाळीनंतर जोडणी : १३५ कोटींचा निधीअमरावती : शेतकऱ्यांच्या शेतीला संरक्षित सिंचन मिळावे, याकरिता जिल्ह्यात आठ हजार शेतकऱ्यांनी कृषिपंपाच्या वीज जोडणीसाठी वीज वितरण कंपनीकडे पैसे भरले आहे. पण या अद्यापही त्यांना प्रतीक्षाच असल्याने त्यांची निराशा झाली आहे. ज्या तालुक्यात खारपाणपट्टा आहे, तेथील शेतकरी पावसावर अवलंबून असतात. काही तालुक्यांत संत्रा उत्पादकांची संख्या अधिक आहेत. त्यांना बारमाही पाण्याची गरज भासते. त्यामुळे बोरवेल किंवा विहिरीतून पाणी देण्यासाठी कृषी पंपाची जोडणी मिळणे गरजेचे आहे. परंतु वीज जोडणीचे पैसे भरल्यानंतरही शेतकऱ्यांना अनेक महिन्यांपासूृन वीज कंपनीकडे हेलपाटे खावे लागत आहेत. मार्च महिन्यापर्यंत सात ते आठ हजार शेतकऱ्यांना कृषिपंप वीज जोडणी देण्यात आली. मार्चनंतर पुन्हा ८ हजार शेतकऱ्यांनी वीज जोडणीसाठी वीज वितरण कंपनीकडे पैसे भरले आहे. परंतु आतापर्यंत निधी उपलब्ध नसल्याने या जोडण्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत, असे वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. कृषिपंप वीज जोडणीसाठी शासनाने वीज वितरण कंपनीला १३५ कोटी रुपये मार्चनंतर मंजूर केले आहे. त्या ६२ कोटींच्या कामांच्या निविदा ही १५ दिवसांपूर्वीच काढण्यात आल्या आहेत. यामध्ये अचलपूर, मोर्शी व अमरावती ग्रामीण या उपविभागाच्या वीज जोडण्यांच्या कामांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे दिवाळी नंतर तरी शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी वीज जोडण्या हजारो शेतकऱ्यांना मिळू शकतात, असा अधिकाऱ्यांना विश्वास आहे. पण या निविदा (ई टेंडरिग) झाल्यानंतर ज्या कंत्राटदाराला हे काम मिळणार आहे. त्यांनी विलंब न लावता विज जोडण्या पूर्ण करव्या आशी अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे. (प्रतिनिधी)
वीजपंप जोडणीचे आठ हजार अर्ज प्रलंबित
By admin | Updated: October 23, 2016 00:34 IST