अमरावती: गाडगेनगर ते शेगाव नाका चौक दरम्यान ७५ कोटींच्या निधीतून निर्माण होणाऱ्या शहरातील पाचव्य उड्डाण पुलाचा मार्ग सुखकर होणार असून माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन उड्डाणपुलाची मागणी केली. या मागणीला यश आले असून सदर काम प्रस्तावित करण्याचे आदेशित करण्यात आले आहे.
डॉ. देशमुख यांनी मंत्री गडकरी यांना शहरातील अत्यंत व्यस्त अशा पंचवटी- कठोरा मार्गावरील प्रचंड वाहतूक तसेच शेगाव नाका चौकात भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा वेध घेत उड्डाण पुल निर्माण करण्यात यावा तसेच या मार्गाचा समावेश केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत करण्यात यावा, अशी विनंती केली होती. त्यासंदर्भात ९ सप्टेंबर रोजी त्यांनी पत्र सुद्धा दिले होत या मागणीला मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उड्डाण पुलाच्या निर्मितीची विनंती मान्य केली.
या पुलाचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते निधीतून वर्ष २०२२-२३ मध्ये समाविष्ट करण्याचे आदेशित केले. तसेच या संदर्भाचे पत्र डॉ. देशमुख यांना २० सप्टेंबर रोजी पाठविले. शहरातील पंचवटी चौक ते कॅम्प शॉट रस्ता हा जिल्ह्यासाठी महत्त्वाचा आह. हा रस्ता पुढे वलगाव, दर्यापूर, अकोट, अचलपूर, परतवाडा, चिखलदरा, धारणीला जोडतो. तसेच याच रस्त्याने मध्य प्रदेशातील खंडवा बैतूल शहरे जोडणारा हा आंतर राज्य महामार्ग सुद्धा आहे. उड्डाण पुलामुळे वाहनांची कोंडी कमी होईल. या उड्डाण पुलाची लांबी जवळपास ६०० ते ७०० मीटर राहणार आहे. तसेच या करिता अंदाजे ७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे,असे डॉ. देशमुख यांनी सांगितले. या पूर्वीही डॉ.सुनील देशमुख यांचे संकल्पनेतून एकात्मिक रस्ते विकास योजनेअंतर्गत पंचवटी ते इर्विन ते राजापेठ असे दोन उड्डाण पूल पूर्णत्वास आलेले आहे तसेच इतवारा बाजार परिसरातील वाहतुकीची कोंडी फोडण्याकरिता इतवारा बाजार ते नागपुरी गेट वलगाव रोड येथे उड्डाण पुलाचे निर्माण कार्य प्रगतिपथावर असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.