अमरावती : महानगरपालिकेतर्फे राजापेठ येथील उड्डाण पूल निर्मितीसाठी ‘सिमेंट मिक्सिंग प्लांट’करिता एका कंपनीला शंकरनगरातील कँसर फाऊंडेशनच्या बाजूला स्मशानभूमी परिसराची जागा देण्यात आली आहे. येथे कंपनीने दोन बोअरवेल खोदून २४ तास पाण्याचा उपसा सुरू असल्यामुळे परिसरातील विहिरींची पातळी झपाट्याने खालावली आहे. शंकरनगरातील नागरिकांनी याबाबत ‘लोकमत’कडे तक्रर केली असून युवा स्वाभिमानी संघटनेने याबाबत महापालिकेच्या बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. महापालिकेच्यावतीने राजापेठ येथील उड्डाण पूल बांधकामाचे ४० कोटी ५३ लक्ष रूपयांची वर्कआॅर्डर नागपूर येथील ‘चाफेकर अँड सन्स कंस्ट्रक्शन कंपनी’ला दिली आहे. हे काम सप्टेंबर २०१५ रोजी सुरू झाले असून ते सप्टेंबर २०१७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. याकामाकरिता २ वर्षांपूर्वी १० कोटींचा निधी प्राप्त झाला होता. हा पूल पूर्णत्वास आल्यानंतर भविष्यात वाढत्या वाहतुकीची समस्या सुटेल. पुलाच्या बांधकामासाठी सिमेंट, गिट्टी मिक्सिंग व इतर साहित्य तयार करण्याच्या प्लांटसाठी या कंपनीसोबत महापालिकेने दोन वर्षांच्या करारावर सिंधी समाज स्मशानभूमीजवळ जागा दिली आहे. येथून १०० फुटांवरच शंकरनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेची मोठी सार्वजनिक विहीर आहे. या विहिरीतूनच मागील अनेक वर्षांपासून १५० ते २०० कुटुंबीयांना घरगुती वापरासाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. कंपनीला महापालिकेने एक बोअरवेल खोदण्याची परवानगी दिली होती. परंतु तेथे पाणी लागले नसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे २०० फुटांवर दुसरी बोरअरवेल खोदून त्यातून २४ तास पाण्याचा उपसा सुरू असल्याने अनेक वर्षात पहिल्यांदाच गृहनिर्माण सोसायटीच्या विहिरीच्या पाण्याची पातळी घसरली आहे. झरे आटत आहेत. त्यामुळे कंपनीने पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. याच ठिकाणी कंपनीचे ५० ते ६० कामगार राहात आहेत. त्यांनाही बोअरवेलमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. प्लांटसाठी दोन बोअरवेल खोदण्याची महानगरपालिकेने परवानगी दिल्याचे शहर अभियंता जीवन सदार यांनी सांगितले. शंकरनगरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. (प्रतिनिधी)४० कोटी ५३ लक्ष रुपयांच्या निधीतून राजापेठ उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. कंपनीला कंम्पलिट मिक्सिंग प्लांटसाठी करारावर जागा देण्यात आली. दोन बोअरवेल खोदण्याची परवानगी त्यांनी घेतली आहे. - जीवन सदारअति.शहर अभियंता, महानगरपालिका.
उड्डाण पुलासाठी बोअरवेल खोदल्याने विहिरींची पातळी खालावली
By admin | Updated: April 7, 2016 00:10 IST