अमरावती : विभागात संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता विभागीय आयुक्त डी.आर. बनसोड यांनी पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून नियोजनबध्द पद्धतीने संभाव्य दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले.अमरावतीसह विभागातील पाचही जिल्ह्यांत पावसाच्या दडीमुळे खरिपाच्या पेरणीत मोठ्या प्रमाणात घट व वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना लागणारे आवश्यक बी-बियाणे, रासायनिक खते उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. मूग, उडीद या पिकांच्या लागवडीचा कालावधी संपला आहे. याशिवाय सोयाबीन पेरणीचा कालावधीही संपत आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता विभागात पीक विमा योजना प्रभावीपणे राबवून अधिकाधिक शेतकऱ्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त बनसोड यांनी केले आहे. संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता आवश्यकतेनुसार योग्य तो आराखडा तयार करावा, यासाठी शासनाकडून वैरणाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिले जाणारे हेक्टरी एक हजार पाचशे रूपयांचे अनुदान बियाणे स्वरुपात उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पुढील काही दिवस पावसाची स्थिती अशीच राहिल्यास भाजीपाल्याच्या किमती वाढण्याची शक्यता लक्षात घेता मोठी गावे, तालुका आणि जिल्हास्तरावर भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. मजुरांना काम उपलब्ध करून देण्यासाठी जलसंधारणाची विविध कामे सुरू करण्याचे निर्देशही यावेळी विभागीय आयुक्त बनसोड यांनी दिले आहेत. या बैठकीला विभागातील जिल्हाधिकारी, कृषी सहसंचालक, कृषी अधिकारी यांची उपस्थिती होती. इतर मुद्यांवरही चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)
दुष्काळाची शक्यता; विभागीय आयुक्तांची बैठक
By admin | Updated: July 17, 2014 23:50 IST