फोटो - पी/०२/पोहरा फोल्डर
अमोल कोहळे
पोहरा बंदी : वनविभागाकडून आटोकाट प्रयत्न करूनही पोहरा जंगलात वणव्याला हिवाळ्यातच प्रारंभ झाला. पोहरा बीटच्या वनखंड क्रमांक ४२ मधील ५० हजार साग रोपवनातील साडेबारा हजार झाडे ऐन हिवाळ्यात शुक्रवारी रात्री धडधडा पेटली. वन्यप्राणी जिवाच्या आकांताने सैरावैरा पळत होते. अखेर वनकर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने दोन तासांत आग विझविली. या आगीमागील आरोपी हुडकून काढण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत पोहरा वर्तुळातील पोहरा बीट वनखंड क्रमांक ४२ मध्ये ३३ कोटीतील ५० हजार सागरोपांची लागवड असलेले रोपवन शुक्रवारी दुपारी पेटले. या आगीत १२ हजार ५०० सागाची मोठी झाडे जळून खाक झाली. वनकर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने आग विझविली. परंतु, तीव्र हवेमुळे सुमारे पाच हेक्टर रोपवन वणव्याच्या विळख्यात आले.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांच्याकडून सातत्याने मार्गदर्शन घेण्यात आले. आग विझविताना चार ब्लोअर मशीनचा वापर करण्यात आला. दोन तासाच्या महत्प्रयासाने ही आग आटोक्यात आली. ही आग हेतुपुरस्सर लावल्याचा अंदाज वनविभागाने वर्तविला असून, आरोपी हुडकून काढण्याचे आदेश भुंबर यांनी दिले.
आग आटोक्यात आणण्यासाठी वडाळी वनपरिक्षेत्र कैलास भुंबर यांच्या मार्गदर्शनात वडाळी वनपाल श्याम देशमुख, वनरक्षक डी.ओ. चव्हाण, चंद्रशेखर चोले, वनमजूर, संरक्षण मजूर यांनी परिश्रम घेतले.
बॉक्स
१५ दिवसांपूर्वी आगीची बोहणी
पंधरा दिवसांपूर्वी पोहरा वर्तुळातील परसोडा बिटमधील रोपवनाला आग लागली होती. त्या आगीत दोन हेक्टर रोपवन जळाल्याने मिश्र रोपांचे नुकसान झाले, तर शुक्रवारी पाच हेक्टर सागाच्या रोपवनाला आगीने विळख्यात घेतले. उन्हाळ्यात जंगलाला आगी लागण्याच्या घटना घडतात. मात्र, आता हिवाळ्यात विनाहंगामी आगी लागण्याच्या घटना घडू लागल्या आहेत, हे विशेष.