वरुड : शिवसेना, राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या २३ सदस्यीय नगरपरिषदेतील नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीची प्रक्रिया झालेली नव्हती. निवडणूक आयोगाने नगराध्यक्षपदाला मुदतवाढ दिली होती. परंतु नगराध्यक्षांना दिलेली मुदतवाढ नियमबाह्य असल्याने नगराध्यक्षांना कार्यमुक्त करुन प्रशासकांची नेमणूक करण्यता आली. यामुळे येत्या काही दिवसांत नगराध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडणूक होणार असल्याने पुन्हा राजकीय हालचालींना वेग आला आहे. वरूडचे नगराध्यक्षपद राखीव असून दोन्ही राखीव उमेदवार ेजनसंग्रामकडे आहेत. यामुळे दोघांमध्ये रस्सीखेच होणार आहे. २३ सदस्यीय वरुड नगरपरिषदेत शिवसेना, राष्ट्रवादीची सत्ता आहे. नगराध्यक्ष शिवसेनेचा तर उपाध्यक्ष राष्ट्रवादीचा आहे. पक्षीय बलाबल पाहता शिवसेना ७, राष्ट्रवादी ५, काँग्रेस दोन, वरुड विकास आघाडी ३, अपक्ष एक, विदर्भ जनसंग्रामचे ५ सदस्य आहेत. नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या हेमलता कुबडे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कैसर जहां अन्सार खाँ आहेत. त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नगरपरिषदेवर प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकारी मोर्शी यांची नियुक्ती केली आहे. पुन्हा नगराध्यक्ष, उपाध्यक्षांची निवडणूक जाहीर झाल्याने शहरात राजकीय वातावरण तापू लागले आहे. स्थानिक नेते सदस्यांची जुळवाजुळव करण्यामागे लागले आहेत. वरुड नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जातींकरिता राखीव असल्याने दोन्ही उमदेवार विदर्भ जनसंग्रामकडेच आहेत. यामुळे दोन्ही नगरसेवकांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. यामध्ये छाया दुर्गे आणि रवींद्र थोरात यांचा समावेश आहे. दोन्ही उमदेवार नगराध्यक्षपदाकरिता इच्छुक असल्याने शिवसेना, राष्ट्रवादी, नगरविकास आघाडी, अपक्ष, आणि काँग्रेसचे नगरसेवक कुणाला मतदान करतात? यावर बरेच काही अवलंबून आहे. यामुळे नगराध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचे नगरसेवकांना डोहाळे लागले आहेत. (तालुका प्रतिनिधी )
नगराध्यक्षपदाचे नगरसेवकांना डोहाळे
By admin | Updated: July 9, 2014 23:14 IST