तीनही समितींवर महिला राज : चांदूरबाजार नगरपालिका
चांदूर बाजार : स्थानिक नगरपरिषदेच्या तीनही विषय समित्यांवर प्रहारने झेंडा रोवला आहे. या तीनही समित्यांवर महिला सदस्यांची वर्णी लागली आहे. प्रहारने तीनही समित्या ताब्यात घेऊन सर्वाधिक सदस्य असलेल्या भाजपला पुन्हा एकदा चपराक दिली आहे.
स्थानिक नगर पालिका सभागृहात शनिवारी शिक्षण व आरोग्य समिती, बांधकाम समिती तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदाची निवडणूक घेण्यात आली. यावेळी प्रहार पक्षाच्या सदस्य शिक्षण व आरोग्य सभापती पदाकरिता फातेमा बानो अ. सलीम यांची अविरोध निवड झाली. बांधकाम सभापतीपदी लविणा सुनील अकोलकर या विजयी झाल्या. महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी चंदा खंडारे व उपसभापतीपदी वैशाली नीलेश खोडपे यांची वर्णी लागली. पाणीपुरवठा व नियोजन समितीचा पदसिद्ध सभापती हा पालिकेचा उपाध्यक्ष असतो. मात्र, उपाध्यक्षपद अद्याप रिक्त असल्याने या समितीच्या सभापतींची निवड झाली नाही. या समितीत आबीद हुसेन, जुलेखबी अ नजीर, सरदार खा, आनंद अहिर, अतुल रघुवंशी या पाच सदस्यांची निवड करण्यात आली आहे. पुन्हा एकदा सर्वाधिक सदस्य असलेल्या भाजपला एकही समिती आपल्याकडे खेचून आणता आली नाही. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांनी प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्ष नितीन कोरडे यांनी सर्व विजयी सदस्यांचे कौतुक केले. यावेळी नगरसेवक सचिन खुळे, सरदार खा, आबीद हुसेन, नजीर कुरेशी आदी सदस्यांनी एकच जल्लोष केला.