अंजनगाव सुर्जी : कोरोना संसर्गामुळे एक वर्षापासूनची बिकट परिस्थिती, पिकांचे नुकसान व मजूर वर्गाच्या हाताला काम नसल्यामुळे स्वत:चा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात महावितरणने बिल थकलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये महावितरणविषयी आक्रोश निर्माण झाला आहे.
शेतकरी व सर्वसामान्य गरीब नागरिकांची सध्याची बिकट परिस्थिती पाहता, वीज ग्राहकांकडून थकीत रकमेपैकी त्यांच्या सवलतीनुसार हप्ते पाडून वीज बिल भरून घ्यावे, जेणेकरून त्यांच्यावर आर्थिक ताण येणार नाही व थकीत बिल भरणे सोयीचे होईल, अन्यथा यामधून एखाद्या दिवशी काही विपरीत घटना घडण्यास वेळ लागणार नाही. याबाबत सर्वस्वी जबाबदारी ही महावितरणवर राहील, असे निवेदन तहसीलदार वैशाख वाहूरवाघ यांच्यामार्फत महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आले. यावेळी शेतकरी मनोहर मुरकुटे, संजय नाठे, हेमंत माकोडे, डिगंबर भोंडे, निखिल धुमाळे, गोविंद भावे, योगेश मोकलकर, सुयोग खाडे, राजेंद्र भुडेकार, गोविंद टिपरे, ज्ञानेश्वर नेमाडे, विनायक येऊल, महेंद्र धुळे, मनोज निंबोकार, मनोहर भावे, शंकर येउल, अक्षय अरबाड उपस्थित होते.