चांदूर बाजार : शासनादेशाप्रमाणे २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. यात नियमानुसार विद्यार्थांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक केल्यामुळे काही शाळांतर्फे युनिफॉर्मला मॅचिंग असा मास्क विद्यार्थ्यांकरिता असावा, अशी शक्कल लढविली जात आहे.
कोरोनाने सर्व जनजीवन विस्कळीत केले आहे. यात प्रभावित झालेल्या गोष्टींपैकी शाळा हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र, शासनाने आदेश दिल्यानंतर २३ नोव्हेंबरपासून शाळेची घंटा वाजली. यात सर्वांनी शासनाच्या नियमाचे पालन करणे अनिवार्य आहे. पण, सध्या काही शाळा व्यवस्थापनाचे डोके काही वेगळे चालताना दिसत आहे. युनिफॉर्म जसा असेल त्याला शोभेल तसा मॅचिंग मास्क मुलांना देता येईल का? यासाठी काही शाळांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. म्हणजेच काय तर मास्कचा युनिफॉर्ममध्ये समावेश. मग शाळा ठरवून देईल तिथूनच तो घ्यायचा आणि ठरवलेल्या किमतीतच पालकांना तो खरेदी करावा लागणार आहे. आधीच कोरोनाने लोकांना आर्थिकदृष्ट्या विकलांग केले आहे. त्यात मॅचिंग मास्कच्या खरेदीचे ओझे नक्कीच दुष्काळात तेरावा महिना म्हणावा लागेल.