महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या बदली स्थगिती लोकांदोलनावर भाजपक्षाने शुक्रवारी पाठविलेली प्रतिक्रिया जितकी अजब तितकीच ती चिंतनीय आहे. चंद्रकांत गुडेवार यांची बदली झालीच नाही. त्यांनीच तशी चुकीची माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली, अशी ती भाजपक्षाची स्वत:हून पाठविलेली प्रतिक्रिया होती. गुडेवारांच्या बदलीचे वारे शहरात यापूर्वीही अनेकदा वाहिले. परंतु त्याचे कधी असे वादळात रुपांतर झाले नाही. तरीही भाजपक्षाची प्रतिक्रिया खरी मानली तर- ''चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीचा विषय शासनाच्या ध्यानीही नव्हता. सारेच कसे सुरळीत सुरू होते. चंद्रकांत गुडेवार नावाच्या अधिकाऱ्याला अचानक कसलीशी उपरती झाली. बदलीची अफवा उडवून शासनाचे कान उपटण्याची त्यांची इच्छा झाली. मनात शिजलेले नाट्य मग त्यांनी प्रत्यक्षात उतरविण्याचे ठरविले. नियोजनानुसार, गुरुवारी सायंकाळी त्यांनी बदलीची बातमी शहरात पेरली. अपेक्षेनुरुप पत्रकारांपर्यंत ती पोहोचली. पत्रकारांनी गुडेवारांना संपर्क केला नि बदली झाल्याची खोटीच माहिती गुडेवार यांनी प्रसिद्धी माध्यमांना दिली,'' प्रकरण असे घडले असावे. भाजपक्षाच्या शहर-जिल्हा समितीच्या दाव्यानुसार, महापालिका आयुक्तांनी हे सारे घडवून आणले असेल तर चंद्रकांत गुडेवार नावाच्या अधिकाऱ्याने मोठाच गुन्हा केला आहे. त्यांनी ही कपोलकल्पित वार्ता पसरवून अमरावतीला दोन दिवस वेठीस धरले आहे. बदलीचे अधिकार मुख्यमंत्र्यांचे असल्यामुळे मंत्रिमंडळाच्या प्रमुखाशी त्यांनी बेअदबी केली आहे. मला वाटेल तेव्हा, वाटेल तशी खोटी माहिती पसरवून मी शासनासकट कुण्याही लोकप्रतिनिधींची खोड जिरवू शकतो, असाच संदेश गुडेवारांनी त्यांच्या या कृत्यातून आहे. दाक्षिणात्य चित्रपटात हीट व्हावा, असा हा घटनाक्रम तद्दन असंवैधानिक आहे. गुन्हेगारी स्वरुपाचा आहे. भाजपक्ष हा शासनकर्ता राजकीय पक्ष असल्यामुळे आणि गुडेवारांनी केलेला गुन्हा त्यांना अवगत झाल्यामुळे गुडेवारांविरुद्ध त्यांनी फौजदारी पोलीस तक्रार नोंदवायलाच हवी. मुख्यमंत्र्यांना हे सारे स्पष्टपणे सांगून गुडेवारांना बडतर्फ करायला हवे. भाजपक्ष असे काहीच करणार नाही. करण्याचे धाडस नाही. कारणही तसेच आहे- स्वपक्षातील एका नेत्याच्या आक्रमकतेमुळे खिंडीत सापडल्यानंतर अंगलट आलेले दूषण, ज्यांच्यामुळे अंगलट आले, त्यांच्यावरच फेकून देण्याचा हा पळकुटा प्रयत्न होता.
- तर करा ना गुडेवारांना बडतर्फ!
By admin | Updated: May 15, 2016 00:01 IST