उत्सव : अपंग, कुष्ठरोग्यांना पुरणपोळीचे भोजनअमरावती : शहरातील दीनदुबळ्यांना दिवाळी सणानिमित्त २८ व २९ आॅक्टोबर रोजी पुरणपोळीचे भोजन मोफत देण्याचा उपक्रम विठ्ठलराव सोनवळकर यांनी आखला आहे. २७ वर्षांपासून ते त्यांच्या मिळकतीतून दीनदुबळ्यांचा दोन गोड घास खाऊ घालण्याचा त्यांचा उपक्रम आहे. हिंदू संस्कृतीतील मोठे सण तसेच राष्ट्रीय सणाला ते शहरातील अंध, अपंग, दीनदुबळ्यांना अशा प्रकारचे जेवण देत असतात. विशेष म्हणजे वाढत्या महागाईच्या काळात त्यांनी आपल्या भाजीपोळी केंद्रातील दरात कोणतीही वाढ केलेली नाही. धान्याच्या बाबतीतही ते कधीच तडजोड करीत नाहीत. संत गाडगेबाबांनी सांगितलेल्या दससूत्रीतील भुकेल्यांना अन्न या सूत्राचा अवलंब करून ते कृतीत उतरविणारे विठ्ठलराव सोनवळकर यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कार्याला कुटुंबाचीही साथ आहे. त्यामुळेच अंबागेट परिसरात त्यांचे सेवाकार्य सुरू आहे. शहरातील अनेक नेते प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या भाजीपोळी केंद्राततील कार्य पाहिले. प्रत्येकांनीच त्यांचे भरभरुन कौतुक केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या सणात शहरात गल्लोगल्ली फिरणाऱ्या अपंग, दीनदुबळे व कुष्ठरोग्यांनाही दिवसाचा आनंद लुटता यावा, म्हणून त्यांनी सलग दोन दिवस मोफत पुरणपोळीचा बेत आखला आहे. २८ व २९ या दोन दिवसात शहरातील दीनदुबळ्यांनी येऊन या पुरणपोळीचा आस्वाद घेऊन संतुष्ट व्हावे व आपल्याला आशीर्वाद द्यावेत, एवढीच त्यांची इच्छा आहे. (प्रतिनिधी)
विठ्ठलाच्या भाजीपोळी केंद्रात दोन दिवस दिवाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2016 00:23 IST