अमरावती : ग्रामीण विकासाच्या विविध योजना राबविण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या संस्था प्रत्येक जिल्ह्यांत १७ मार्च २००४ रोजी स्थापन करण्यात आल्यात. यातील काही योजना बंद आहेत. यंत्रणेकडे मनुष्यबळदेखील कमी आहे. त्यामुळे या यंत्रणेचे पुनर्गठन करण्यात येऊन कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतिबंध करण्यात येणार आहे व यासाठी समितीचे गठन करण्यात येणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत असणाऱ्या काही योजना आज बंद आहेत. एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम (डब्ल्यूडीपी), हरियाली योजना त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेमध्ये बदल झालेले आहे. स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना व इंदिरा आवास योजनांचा यामध्ये समावेश आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे असलेले मनुष्यबळ कालबाह्य झालेले आहे. या यंत्रणेकडील काही पदे अनावश्यक आहे. योजनांच्या सुधारित अंमलबजावणीच्या अनुषंगाने नवीन पदे निर्माण करणे आवश्यक झाले आहे. याचा सर्व आढावा घेऊन सुधारित आकृतिबंध करण्याची आवश्यकता आहे. यासाठी यंत्रणेचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. यासाठी समितीचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे होणार पुनर्गठन
By admin | Updated: February 1, 2015 22:49 IST