अचलपूरचा तूर खरेदीचा वाद : चार दिवसांत नाफेडची खरेदी नाहीपरतवाडा : अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय तूर खरेदीचा शुभारंभ गुरूवारी झाला असतानाही नाफेडतर्फे चार दिवसांत दाण्याचीही खरेदी करण्यात आली नाही. यासंबंधी चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी डी.के.वानखडे यांना मंगळवारी दिले. चौकशीत दोषी आढळलेल्या अडते आणि व्यापाऱ्यांचे परवाने रद्द केले जाईल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.अचलपूर बाजार समितीचे उपसभापती कुलदीप काळपांडे, संचालक साहेबराव काठोडे, रयत संस्थेचे राहुलकडू, पोपट घोडेराव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मंगळवारी तक्रार केल्यानंतर तातडीने सुत्रे हलली. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नाफेडमार्फत शासकीय तूर खरेदीचा मोेठ्या थाटात ४ फेब्रुवारीला शुभारंभ करण्यात आला. मात्र, मंगळवारपर्यंत नाफेडतर्फे तुरीची खरेदी कऱ्यात आली. त्यामुळे अडते व्यापारी पडत्या भावाने शेतकऱ्यांची तूर खरेदी करीत असल्याची तक्रार उपसभापती कुलदीप काळपांडे व संचालकांनी केली. व्यापाऱ्यांसोबत नाफेडच्या अधिकाऱ्यांनी संगनमत केल्याचा गंभीर आरोेप जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीत करण्यात आला. यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांचे डीएसओला चौकशीचे आदेश
By admin | Updated: February 10, 2016 00:21 IST