जागतिक जैवविविधता दिवस : वाढती लोकवस्ती, जलप्रदूषणाचे संकटअमरावती : मेळघाट, पोहरा, मालखेड व महेंद्रीसारख्या समृध्द जंगलामुळे अमरावती जिल्ह्याला जैवविविधतेचा वारसा लाभला आहे. मात्र, वाढती लोकवस्ती व जलप्रदूषणामुळे ही जैवविविधता संकटात सापडली आहे. जागतिक जैवविविधता दिवसाचे औचित्य साधून नागरिकांनी ही जैवविविधता जोपासण्याचा प्रण केला, तरच भविष्यात ही जैवविविधता टिकेल. जिल्ह्यातील गवताळ माळरानात जल अधिवास असलेली तलाव, धरणे व वन विभागाने तयार केलेले कृत्रिम पाणी स्रोतामुळे जैवविविधता संपन्न झाली. जिल्ह्यात वाघापासून तर जंगलातील पक्ष्यांपर्यंत विविध प्रजातीचे पशूपक्षी आढळून येतात. जंगलात सस्तन प्राण्यांच्या ४० प्रजाती आढळून येत असून त्यामध्ये सर्वोच्च स्थान हे वाघाचे आहे. मेळघाटात जवळपास वाघांची संख्या ४० आहे.जिल्ह्यातील जगंलात वाघ बिबट, चितळ, काळवीट, तडस, नीलगाय आदी वन्यप्राण्यांसोबत पक्ष्यांच्या शेकडो प्रजातीसुद्धा आढळून आल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत जंगलाच्या दिशेने वाढती लोकवस्ती वन्यप्राण्यांच्या अधिवासावर घाला घालत आहे. लोकवस्तीतील नागरिक जंगलाच्या दिशेने आगेकूच करीत असल्यामुळे वन्यप्राणी अधिवास सोडून शहराच्या दिशेने वाटचाल करताना आढळून आले आहे. शिकारीचे वाढते जाळे जैवविविधता नष्ट करण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्यातच जंगलातील पाणी स्त्रोतामध्ये वाढते प्रदूषणसुद्धा जैवविविधतेला गालबोट लावीत आहे. त्यामुळे नागरिकांनी जंगल आणखी समृध्द बनविण्यासाठी व पुढील पिढीसाठी ही जैवविविधता टिकून ठेवण्यासाठी नागरिकांनी आतापासून पाऊल उचलणे गरजेचे आहे.८०० प्रकारचे वृक्ष -वेलीमेळघाट हा विविध वनस्पतीने संपन्न असून तेथे ८०० पेक्षा अधिक वृक्ष, गवत व वेली अशा विविध वनस्पती आढळतात. मात्र, दिवसेंदिवस वाढती वृक्षतोड ही जैवविविधता नष्ट करण्यास कारणीभूत ठरत आहे. (प्रतिनिधी)जैवविविधतेतील प्रत्येक घटक पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महत्वपूर्ण आहे. पर्यावरण संतुलीत असल्यास मानवी जीवन सुसह्य होईल. त्यासाठी जल, जमीन, जंगल व पर्यायाने त्यांतील जैवविविधता टिकून ठेवण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. - जयंत वडतकर,मानद वन्यजीव रक्षक.
जिल्ह्याला लाभला जैवविविधतेचा वारसा
By admin | Updated: May 22, 2016 00:10 IST