वरूड : तालुक्यातील हातुर्णा येथील १८२ पूरपीडितांना भूखंडाचे वितरण करण्यात आले. अनेक वर्षांनंतर त्यांना दिलासा मिळाला आहे. सन १९९१ साली वर्धा नदीला आलेल्या पुराचा हातुर्णा गावातील नागरिकांना जबर फटका बसला. या पुरात अनेक घरे वाहून गेली. यावेळी हातुर्णा येथील १८२ नागरिकांचे पुनर्वसनाचे आश्वासन शासनाने दिले होते.
कालांतराने तेथील शासकीय जमिनीवर पट्टेसुद्धा पाडण्यात आले. मात्र, २९ वर्षांनंतर प्रत्यक्षात १८२ पुनर्वसित नागरिकांना भूखंडाचे वाटप झालेले नव्हते. पट्टे न मिळाल्याने पुरात खचलेल्या घरात राहणे नागरिकांच्या नशिबी आले आहे. त्यामुळे अनेकांची राहती घरे खचली, पडली, काही नागरिक गावातच जागा मिळेल तिथे राहत आहेत. कुणी भाड्याच्या घरात राहत आहेत. अनेक वर्षांपासून हातुर्णा येथील पुरपीडित नागरिक न्यायाच्या प्रतीक्षेत असताना हातुर्णा येथील पूरपीडित नागरिकांच्या समस्या तातडीने निकाली काढण्यासाठी तात्काळ भूखंड वाटपाचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २९ लाभार्थ्यांना आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते भूखंड वाटप करण्यात आले.
त्यावेळी तहसीलदार किशोर गावंडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळू पाटील, नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी, ग्रामसेवक वणवे, मनोहरराव खरडे, विनोद ठाकरे, राहुल महल्ले, पंकज ठाकरे, गणेशराव घरडे उपस्थित होते.
---------------