गणेश वासनिक लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याच्या वन विभागाने उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना जागतिक वन दिनाचे औचित्य साधून २१ मार्च २०२५ रोजी मुंबई येथे शानदार सोहळ्यात ७९ जणांना सुवर्ण, रजत पदकांनी गौरविले. मात्र, या पदकांच्या यादीत गैरप्रकार झाला असून, पदकासाठी वनपालाचा प्रस्ताव पाठविला असताना ठाणे येथील विभागीय व्यवस्थापकाला सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले आहे. याप्रकरणी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे विविध कर्मचारी संघटनांनी तक्रार केली आहे.
ठाणे येथील वन प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक योगेश टीकाराम वाघाये यांनी वन उत्पादनात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना 'सुवर्ण' पदकाने वनमंत्री गणेश नाईक, वन विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, वन विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिश्वास आदींच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. मात्र, डीएम योगेश वाघाये यांनी सुवर्णपदक मिळविण्यासाठी आपल्या नावाची घुसखोरी केली, अशी तक्रार वन कामगार संघटनेने २१ मे २०२५ रोजी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे तक्रार केली आहे. डीएम वाघाये यांच्यावर अपहार, भ्रष्टाचार, अनियमिततेचे आरोप असताना शासनाकडून पदकांनी कसे गौरविले जाते, असा सवाल राज्य वनविकास महामंडळ अधिकारी व कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष बी. बी. पाटील यांनी ८ मे रोजी वनमंत्री गणेश नाईक यांना पाठविलेल्या पत्राद्वारे उपस्थित केला आहे. योगेश वाघाये यांचे नाव पदकांच्या यादीत कुणी, कसे घुसविले याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
'एफडीसीएम'चे अपर मुख्य सचिवांना पत्रमहाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड यांनी १२ मार्च २०२५ रोजी महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव (वने) यांना पाठविलेल्या पत्रानुसार सन २०२२-२०२३ या वर्षासाठी 'वन उत्पादन' या कार्यप्रकारात योगेश वाघाये यांचे नाव कोणत्याही पदकासाठी केव्हाही प्रस्तावित करण्यात आले नाही, तसेच त्यांची सर्वसाधारण कामगिरीसुद्धा पदक प्रदान करण्यासारखी आहे, असे कार्यालयास वाटत नाही, ही बाब शासनाच्या निदर्शनास आणण्यात येत आहे, असे कळविले होते. तरीही डीएम योगेश वाघाये यांना सुवर्णपदक पटकावण्यात यश आले आहे. त्यामुळे पदके वाटपात 'कुछ तो गडबड है' असा सूर आता उमटू लागला आहे.
"एफडीसीएम'ने मला मिळालेल्या सुवर्ण पदकांसंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार केला, याविषयी माहिती नाही, तसेच तक्रारीबाबत शासनाकडून कोणताही पत्रव्यवहार नाही. कामाचे मूल्यमापन म्हणून वन उत्पादन या प्रकारात सुवर्णपदकाने सन्मान झाला आहे."- योगेश वाघाये, विभागीय व्यवस्थापक, वन प्रकल्प, ठाणे