अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आपत्ती व्यवस्थापन, प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन केंद्र असलेले एकमेव अमरावती विद्यापीठ आहे. गत तीन वर्षांत १९८ महाविद्यालयांत आपत्ती व्यवस्थापनाकरिता राष्ट्रीय सेवा योजनेद्धारा जनजागृती, पथनाट्य, रॅली आदी कार्यक्रम घेण्यात आले.
शुक्रवार,१२ मार्च रोजी पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिसभेत सदस्य मनीष गवई यांनी आपत्ती व्यवस्थापन, प्रशिक्षण केंद्राबाबत प्रश्न विचारून विद्यार्थी हिताला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. विद्यापीठाकडून आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रतिविद्यार्थी १० रुपये गोळा झालेल्या निधी व्याजाच्या रकमेतून तीन वर्षांत ९ लाख ८६ हजार रुपये खर्च करण्यात आला. रासेयाे स्वयंसेवकांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षणसुद्धा घेतले. येत्या काळात पूर परिस्थिती हाताळणे, आगीवर नियंत्रण, आपत्कालीन प्रथमोपचार करणे, साप व इतर वन्यजीवांपासून अपघात झाल्यास जीव वाचविणे, पहाडावरील नैसर्गिक, कृत्रिम आपत्तीचे व्यवस्थापन, अपघात अथवा आपत्तीच्या वेळी प्राथमिक उपचार करणे आदी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
आपत्ती व्यवस्थापनासाठी एअर किट, जॅकेट, फायरमेन एक्स, फायर ब्लँकेट, सर्च लाईट आदी साहित्यांची खरेदी करण्यात आली. मात्र, महाविद्यालयांचे फायर ऑडिट झाले नाही, अशी माहिती पुढे आले आहे.
----------------
अशी आहे आपत्ती व्यवस्थापन समिती
विद्यापीठांतर्गत आपत्ती व्यवस्थापन समितीचे गठण करण्यात आले असून, यात ११ सदस्यांचा समावेश आहे. समितीचे अध्यक्ष म्हणून कुलगुरू मुरलीधर चांदेकर तर, सदस्यपदी सुनील देशपांडे, सुरेंद्र रामेकर, गणेश बोरोकार, भारत कऱ्हाड, शशिकांत रोडे, श्रीकांत पाटील, अनिल घोम, राजेश मिरगे, प्रशांत मिरगे, प्रशांत शिगंवेकर, राजेश बुरंगे यांचा समावेश आहे.