अतिरिक्त बांधकाम : आयुक्तांकडून जागेची तपासणीअमरावती : नागपूर महामार्गालतच्या हॉटेल ‘गौरी इन’मध्ये मंजूर बांधकामापेक्षा अतिरिक्त बांधकाम असल्याप्रकरणी हॉटेल संचालकांनी सोमवारी ३० लाख रुपयांच्या दंडाचा भरणा केला. यामुळे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सुरु केलेल्या कारवाईला बळ मिळाले आहे.मौजे रहाटगाव सर्वे नं. १३५/२ भूखंड क्र. २०२५ येथील हॉटेल गौरी इनची तपासणी करण्यात आली होती. या हॉटेलचे क्षेत्रफळ ४५२२. ४० चौरस मिटर असून बांधकाम मंजुरीचे क्षेत्रफळ ३३९१.८० चौरस मीटर आहे. मात्र, आयुक्तांच्या आदेशानुसार हॉटेल बांधकामाची तापसणी केली असता हे क्षेत्रफळ ४२६७.७१ चौरस मीटर इतके आढळले होते. हॉटेल संचालकांनी ८७५.९१ चौरस मीटर अतिरिक्त बांधकाम केल्याचे स्पष्ट झाले होते. हे अतिरिक्त बांधकाम नियमानुकूल करण्यासाठी हॉटेल संचालकांना दंडात्मक रक्कम भरण्यासाठी नोटीस बजावली होती. प्रशासनाने दंडात्मक रक्कम भरण्यासाठी सतत पाठपुरावा केला. तसेच नोटीस बजावून फौजदारी कारवाईचे संकेत दिले होते. परिणामी हॉटेल संचालकांनी सोमवारी ३० लाख रुपये दंड भरून अतिरिक्त बांधकाम नियमानुकूल करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी अनधिकृत बांधकाम, अतिरिक्त बांधकामाची शोधमोहीम सुरू केल्याच्या पार्श्वभूमिवर ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. आयुक्तांनी यापूर्वी अतिरिक्त आणि अनधिकृत बांधकाम तपासणीची मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार हॉटेल गौरी इनचे बांधकाम अतिरिक्त असल्याचे स्पष्ट झाले होते. (प्रतिनिधी)हॉटेल गौरी इनद्वारा बांधकाम परवानगीसाठी ३० लाख रुपयांचा दंडाचा भरणा केला. मात्र कर आणि दंडाची रक्कम वसुलीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. ही प्रक्रिया सुरू असून रक्कम भरण्यासाठी टप्पे पाडून दिले आहे.- नरेंद्र वानखडे,सहायक आयुक्त, झोन क्र.१
‘गौरी इन’च्या संचालकांनी भरला ३० लाखांचा दंड
By admin | Updated: February 2, 2016 00:00 IST