राणांचा पाठपुरावा : केंद्रीय मंत्र्यांचा आज दौराअमरावती: भातकुली तालुक्यातील ऋणमोचन तिर्थक्षेत्रासह नांदेडा व जसापूर या गावांसाठी १५० कोटींचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे. केंद्रीयमंत्री पीयूष गोयल हे शनिवारी ऋणमोचन तिर्थक्षेत्रस्थळाला भेट देतील. आ.रवि राणा यांच्या प्रयत्नांनी विकास आराखडा तयार होत आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी यासंदर्भात बैठक पार पडली. यावेळी आ. रवि राणा, ना. पियूष गोयल यांचे विशेष कार्य अधिकारी पी. एस. गोतमारे, स्वीय सहायक अनिल सिंग, जिल्हाधिकारी किरण गित्ते आदींनी ना. गोयल यांच्या दौऱ्याचे नियोजन केले. ना. पियूष गोयल यांच्या हस्ते ऋणमोचन येथे ३०० शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे वाटप केले जाणार आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना सायकल वाटप, वृक्षरोपणाचा कार्यक्रमाविषयी चर्चा झाली. कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या ऋणमोचन येथे ढोल दिंडीचा गजर, गोापाला- गोपाला देवकीनंदन गोपाला या भजनाच्या गजरात ना. गोयल यांचे स्वागत केले जाईल. ना. गोयल यांनी बडनेरा मतदारसंघातील तीन गावे दत्तक घेतली आहे. जिल्हा प्रशासनाला या दौऱ्याच्या अनुषंगाने जय्यत तयारी करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. बैठकीला उपविभागीय महसूल अधिकारी जगताप, तहसीलदार वैशाली पाथरे, कृषी अधिकारी अनिल खर्चान, कार्यकारी अभियंता मोहोड आदी उपस्थिती होते.
तीर्थक्षेत्रांसाठी १५० कोटींचा विकास आराखडा
By admin | Updated: June 25, 2016 00:06 IST