तीन महिन्यांपूर्वीचा कट : एनसीसी भवनसमोरील घटना अमरावती : कपडा व्यावसायिकांच्या वसुलीचे पैसे घेऊन जाणाऱ्या महेश सच्चानंद फेरवाणी (३०,रा.सरस्वती नगर) यांची लुटण्याच्या उद्देशाने चाकू भोसकून हत्या केली. याप्रकरणी चार आरोपींनी तीनवेळा महेशला लुटण्याचा कट रचला. मात्र, ते अपयशी ठरले. चौथ्या प्रयत्नात आरोपींनी महेशची हत्या करून त्यांच्याजवळील १ लाख ६० हजार रुपये हिसकून नेले. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. प्रविण नगर रोडवरील एनसीसी कॅम्पसमोर महेश फेरवाणी हा रक्तबंबाळ अवस्थेत गाडगेनगर पोलिसांना आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल किनगे, सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी ताफ्यासह घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा केला असता घटनास्थळी एक मोबाईल आढळला. पोलिसांनी मोबाईलधारकांचा शोध घेतला असता तो मोबाईल शैलेश ऊर्फ अन्नु चौधरी (रा.बेलपुरा) या युवकाचा असल्याचे कळले. या युवकाचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वेरुळकर यांचे पथक रवाना झाले. मात्र, त्यांना आरोपी मिळाला नाही. मात्र, आरोपीचा शैलेश हा मित्र रवि धोटेसोबत असल्याचे समजले. मृत हा सिंध गारमेंटची वसुली करून घरी परतताना तेथेच काम करणाऱ्या नीलेश रमेश चव्हाण (२५,रा. किशोरनगर) व पंकज अशोक मिश्रा (रा.राजापेठ) यांच्या संपर्कात असल्याचे पोलिसांना कळले. त्यानुसार पीएसआय प्रवीण पाटील व सहायक पोलीस निरीक्षक फिरोज पठाण यांनी दोन्ही युवकांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यांनी बजावली महत्त्वपूर्ण भूमिकाहत्येनंतर आरोपी मोर्शी पसार झाले होते. त्यानुसार पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस उपायुक्त शशिकुमार मिना, सहायक पोलीस आयुक्त चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अतुल वर, पोलीस उपनिरीक्षक वेरुळकर यांचे पथक मोर्शी रवाना झाले होते. मात्र, आरोपी मिळू शकले नाही. दरम्यान गाडगेनगर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक विनीत कदम यांच्या पथकातील पोलीस हवालदार बबलू येवतीकर, अहमद अली, सचीन पिसे, अजय लोखंडे यांनी आरोपींना अटक करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
लुटमारीनंतर हत्या करणारे अटकेत
By admin | Updated: August 30, 2016 00:04 IST