नैसर्गिक झाडे तोडून रोपवनाचा प्रयत्न : ब्रॉड गेजवर प्रश्नचिन्ह
अनिल कडू
परतवाडा : ‘शकुंतला’ रेल्वेच्या अचलपूर स्थानकासमोरील खुल्या जागेवरील झाडे तोडून अचलपूर सामाजिक वनीकरण विभागाने रोपवनाचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे या रेल्वेच्या ब्रॉडगेजवरच प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. यातून सामाजिक वनीकरण विभागाने लोकभावना पायदळी तुडवल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
अचलपूर रेल्वे स्थानकासमोरील आवारातील खुल्या जागेत १० ते १५ वर्ष वयाची बंगाली काटेरी बाभळीची शेकडो झाडे उभी आहेत. भर उन्हात ही जंगलरूपी वनराई त्या परिसरात शीतल छाया देते. जवळपास सहा ते सात फुटांपेक्षा अधिक उंचीची ही झाडे आहेत. या हिरव्यागार वनराईत पशुपक्षी आणि सरपटणारे प्राणी मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. मात्र, पर्यावरणाला पोषक या वनराईकडे सामाजिक वनीकरण विभागाची वक्रदृष्टी वळली. त्या जवळपास १३ हेक्टर जागेवर स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी रोपवन प्रस्तावित केले. शासनाचे लाखो रुपये त्यावर खर्ची घालण्याचे नियोजन केले. लाखो रुपयांचा निधीही याकरिता स्वत:कडे वळता करून घेतला आणि ही नैसर्गिक वनराजी तोडून ते क्षेत्रसफाईचा ठेका स्वमर्जीतील चिखलदरा येथील एका इसमाला दिला. तीन दिवसांपासून तो ठेकेदार झाडे तोडत आहे.
लोहमार्गाला लागून अवघ्या चार ते पाच फुटावर सीसीटीव्ही खोदण्याचे नियोजन वनपरिक्षेत्र अधिकाºयांनी केले आहे. यात पाणी, मुरुम, काळ्या मातीवरील हा शकुंतलेचा लोहमार्गही दबणार आहे. अस्तित्वात असलेले जंगलरूपी असंख्य नैसर्गिक मोठी झाडे तोडल्यानंतर त्या लाकडाची विल्हेवाट कशी लावली जाणार, ते इंधनरूपी लागड कुणाला विकले जाणार, यातून येणाऱ्या उत्पन्नाचे काय, हे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत.
सागाची झाडे लावणार? ब्रॉडगेज रखडणार
दरम्यान, शासनाच्या लाखो रुपयांची उधळपट्टी करून वनपरिक्षेत्र अधिकारी या ठिकाणी सागाची झाडे लावणार आहेत. ही सागाची झाडे मोठी व्हायला जवळपास १५ ते २० वर्षे लागतील. मात्र, ही झाडे लावल्यामुळे जागा नाही म्हणून प्रस्तावित ब्रॉडगेज पुढील २० वर्षे रखडण्याची शक्यता आहे. लोहमार्गापासून दहा मीटर अंतर सोडून आणि कुठलीही वृक्षतोड न करता खड्डे करून रोप लावण्याची प्रथादेखील यामुळे पायदळी तुडविली जात आहे.
कोट
रोपवन करताना वृक्षतोड करता येत नाही. लोहमार्गाचे नियमही पाळावे लागतात. अचलपूरचा हा नेमका प्रकार काय आहे, याची माहिती घेण्यात येईल. माहिती घेतल्यानंतर परिस्थिती बघूनच त्यावर बोलता येईल.
- नितीन गोंडाणे, प्रभारी विभागीय वनअधिकारी
सामाजिक वनीकरण विभाग, अमरावती
पान २ ची बॉटम