अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा सर्वाधिक फटका वित्त व लेखा, अंकेक्षण विभागाला बसला. फेब्रुवारीत एकूण १५ कर्मचारी कोरोना संक्रमित आढळून आले होते. त्यापैकी केवळ चार कर्मचारी रुजू झाल्याची माहिती आहे. मार्च एन्डिंगमुळे फायली ‘जैसे थे’ पडून आहेत. देयके कशी अदा करावी, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संचारबंदीत शिथिलता लागू केली असली तरी सरकारी, निमसरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्केच कर्मचारी उपस्थिती अनिवार्य केली आहे. अशातच विद्यापीठातील परीक्षा विभाग, सामान्य प्रशासन, महाविद्यालयीन विभागासह वित्त, लेखा, अंकेक्षण विभागात सर्वाधिक कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन असतानासुद्धा तोकड्या कर्मचाऱ्यांमुळे विद्यापीठाकडून व्यवस्थित माहिती पाठविण्यात आलेली नाही. १२ मार्च रोजी ऑनलाईन अधिसभा पार पडली. या सभेतही कोरोनाचा प्रभाव दिसून आला. एकंदरीत विद्यापीठातील कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय असे एकूण ६४ संक्रमित आढळून आल्याची माहिती आहे. प्रत्येक दोन ते तीन दिवसांनी कुठल्या तरी विभागात कर्मचारी कोरोना संक्रमित निष्पन्न होत आहे.
विद्यापीठाची आर्थिक बाजू हाताळणाऱ्या वित्त व लेखा, अंकेक्षण विभाग कोरोनाबाधित झाल्याने या विभागाचे कामकाज रेंगाळले आहे. कंत्राटदार, पुरवठादार, परीक्षा विभागातील फायली तुंबून आहेत. काही कर्मचारी होम आयसोलेशनमध्ये, तर कुणी रुग्णालयात दाखल असल्याची माहिती पुढे येत आहे. कामगार, मजुरांशी निगडित देयकांच्या फायली जानेवारीपासून प्रलंबित आहेत. मजुरांना दोन महिन्यांची मजुरी देण्यात आली नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदारांपुढे बिकट प्रश्न उपस्थित झाला आहे. वित्त, लेखा, अंकेक्षण विभागात महत्त्वाच्या टेबलवर कर्मचारी नियु्क्त करून कामकाज सुरळीत करावे, अशी मागणी होत आहे.
----------------
परीक्षा विभागाला फटका
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यांकन विभागाला कोरोनाने जबर फटका बसला आहे. महत्त्वाच्या विभागाचे अधिकारी, कर्मचारी कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. मात्र, मोजक्याच कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर बोलावून परीक्षांशी निगडित कामे करण्यात येत आहेत. अभियांत्रिकी परीक्षांचे २२ मार्चपासून नियोजन चालविले आहे तसेच १५ एप्रिलपासून अन्य परीक्षांचे वेळापत्रक तयार करण्यात येत आहे.