प्रतिबंधात्मक उपायांची गरज : आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्हअमरावती : जुलै महिना सरता-सरता डेंग्यू आजाराने बाधित सात रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णलयात दाखल करण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा करते तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वर्षीपासून जिल्ह्यात डेंग्यू आजाराचा प्रभाव झपाट्याने वाढतोय. गेल्या वर्षी जिल्ह्यात डेंग्यूसदृश तापाने ८ ते १० जणांचे बळी घेतले होते. त्यामुळे डासांपासून निर्माण होणारे आजार वाढत असल्याचे चित्र आहे. विविध तापांचा प्रादुर्भाव होण्यास विशिष्ट ऋतुची मर्यादा राहिलेली नाही. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतुंमध्ये हे आजार डोके वर काढीत आहेत. यावरून डासांचा प्रादुर्भाव रोखण्साठी मुळात उपाययोजना करण्याची गरज आहे. नागरिकांनीदेखील आरोग्यविषयक सतर्कता बाळगल्यास या आजारांवर नियंत्रण मिळविता येते. ३० टक्क्यांनी वाढले डेंग्यू रुग्णकाही वर्षांत कीटकजन्य व जलजन्य आजारांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जगभरात डेंग्यू आजाराचा फैलाव झाला आहे. मागील पन्नास वर्षांत डेंग्यू आजारात ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेचा आहे. वाढते शहरीकरण, दुषित पाणी या आजारात भर टाकत आहे. डेंग्यू आजार डासांमुळे पसरतो. एडिस डासाच्या मादीमुळे डेंग्यूची लागण होते. हा डास स्वच्छ पाण्यामध्ये अंडी देवून आपली संख्या वाढवितो. तीव्र ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, डोळ्याच्या खोबणीमध्ये दुखणे, अंगावर लासर पूरळ, तीव्र पोटदुखी, गंभीर रुग्णास रक्तस्त्राव असे डेंग्यूचे लक्षण आहे. डेंग्यू रुग्णांचा प्लेटलेट कमी झाल्याने होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे आणि शॉकमुळे रुग्णांचा मृत्यूदेखील होतो. त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखणे अत्यंत गरजेचे आहे. दीड वर्षात जिल्ह्यात १०० पेक्षा अधिक रुग्णांना हा आजार झाल्याने त्यांना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामध्ये बहुतांश रुग्ण उपचाराने बरे झाले असून एक ते दोन रुग्ण दगावल्याचे सांगण्यात येते. दर महिन्यात डेंग्यूचे रुग्ण दाखल होत असून जुलै महिन्यात ७ रुग्णांची नोंद आहे. प्रशासन स्तरावर उपाययोजना केल्या जात असून नागरिकांनीही डासांची उत्पत्ती रोखणे गरजेचे आहे.
इर्विनमध्ये डेंग्यूचे आणखी सात रुग्ण दाखल
By admin | Updated: July 26, 2014 23:51 IST