अमरावती : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात डेंग्यूसदृश रोगाने थैमान घातले आहे. महिनाभरात डेंग्यूसदृश तापाचे शंभरावर रूग्ण जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी पाच रूग्णांचा मृत्यू झाला. रूग्णांचा मृत्यू हा डेंग्यूमुळेच झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पावसाळा संपल्यानंतर उन्हाची तीव्रता वाढली. मध्यंतरी उकाडा निर्माण झाला होता. आता थंडीचा जोर हळुहळू वाढत आहे. हवामानाच्या बदलामुळे ‘व्हायरल इन्फेक्शन' बळावले असून त्यातून विविध आजारांना आमंत्रण मिळत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पसरलेली अस्वच्छता व घाणीच्या साम्राज्यामुळे रोगराईचा प्रसार वेगाने होत असल्याचे चित्र आहे. दूषित पाणी व उघड्यावरील अन्नपदार्थांमुळे होणारे आजार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सर्दी, खोकला व तापाच्या रूग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. जिल्हा सामान्य रूग्णालयांमध्ये दररोज तापाचे शेकडो रूग्ण उपचाराकरिता दाखल होत आहेत. त्याचप्रमाणे तापाच्या उपचाराकरिता खासगी रूग्णालयातही मोर्ठी गर्दी वाढली आहे. महिन्याभरात इर्विन रूग्णालयात डेंग्यूसदृश तापाने बाधित शेकडो रूग्ण दाखल केले गेले. त्यांची रक्तनमुना तपासणी केल्यावर त्यापैकी दहा रूग्ण डेंग्यूचे पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले आहेत. मात्र, रूग्णांच्या रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्याने पाच रूग्ण दगावलेत. ही बाब आरोग्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे नागरिकांनी डासांचा प्रादुर्भाव रोखण्यावर व परिसर स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष पुरवावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. डेंग्यूविषयी माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक राऊत यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी सपर्क होऊ शकला नाही. तापाने चिमुरडीचा मृत्यूअप्पर वर्धा कॉलनीतील रहिवासी खुशी प्रवीण ढवळे ही ११ वर्षिय मुलगी तापाने फणफणत होती. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, मंगळवारी तिला अचानक उलट्यांचा त्रास जाणवल्याने तत्काळ इर्विन रुग्णालयात आणण्यात आले असता मृत घोषित करण्यात आले.टायफाईडचे ७१ रुग्ण पॉझिटिव्हमागील आठवड्यात इर्विनच्या बाह्यरूग्ण विभागात विविध आजारांनी ग्रस्त ५ हजार ६५८ रुग्णांच्या नोंदी झाल्या आहे. त्यामध्ये ३७७ रुग्ण तापाच्या उपचाराकरिता दाखल करण्यात झाले आहेत. या रुग्णांची रक्तनमुने तपासणी करण्यात आली असता तब्बल ७१ रुग्ण टायफाईड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. महिनाभरात शंभरावर रुग्ण दाखल : आठवडाभरात ७१ ‘टायफाईड पॉझिटिव्ह’मागील महिन्यात डेंग्यूसदृश आजाराचे शंभरावर रुग्ण दाखल झाले. त्यांची रक्तनमुने तपासणी करण्यात आल्यावर दहा रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्याचे आढळून आले. त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डेंग्यूचे डास सकाळच्या वेळी चावतात. त्यामुळे नागरिकांनी घराच्या आवारात साचलेल्या पाण्याचा निचरा त्वरित करावा. - सुनीता मेश्राम, वैद्यकीय अधिकारी, इर्विन रुग्णालय.
जिल्ह्यात डेंग्यूचे थैमान, पाच रुग्णांचा मृत्यू
By admin | Updated: November 3, 2016 00:06 IST