व्यवसाय करण्याची मुभा : १६५३ फेरीवाल्यांव्यतिरिक्त अन्य अनधिकृतअमरावती : महानगरपालिका क्षेत्रातील ४९५ फेरीवाल्यांसाठी ११ हॉकर्स झोन निश्चित करण्यात आले आहेत. सर्व्हेक्षणानंतर ज्या फेरीवाल्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली आहे, त्यांना या परिसरातील हॉकर्स झोनमध्ये व्यवसाय सुरू करता येईल. फेरीवाल्यांच्या योग्य पुनर्वसनासाठी पालिका यंत्रणेने पुढाकार घेतला आहे. मागील आठवड्यापासून शहरात सर्वदूर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली जात आहे. त्यात फेरीवाल्यांचे अतिक्रमणही हटविण्यात आले. त्यामुळे फेरीवाल्यांनी व्यवसाय कोठे करावा, अशी सार्वत्रिक ओरड होत आहे. मोहिमेविरोधात मोर्चे, निदर्शनेही होत आहेत. या पार्श्वभूमिवर महापालिका प्रशासनाने फेरीवाला क्षेत्राची यादीच घोषित केली आहे. ‘सिमॅक’ या एजंसीने महापालिका हद्दीतील फेरीवाल्यांचे बायोमेट्रीक सर्व्हेक्षण केले होते. त्यात ४१२१ फेरीवाल्यांची नोंद करण्यात आली. त्यानंतर झोनच्या दाखल्यासह अन्य काही कागदपत्रांची पूर्तता फेरीवाल्यांना करावयाची होती. त्यासाठी वारंवार मुदतवाढही देण्यात आली. त्यातील १६५३ फेरीवाल्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली. त्यांना पालिकेद्वारे स्मार्टकार्ड दिल्या जाणार आहे. या १६५३ फेरीवाल्यांपैकी ४९५ फेरीवाल्यांना त्यांच्या व्यवसायाकरिता पहिल्या टप्प्यात ११ हॉकर्स झोनमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. उर्वरित फेरीवाल्यांसाठी ४० ते ४५ हॉकर्स झोन नव्याने निर्माण करण्याकरिता जागेची पाहणी अंतिम टप्यात आहे. या नोंदणीबध्द १६५३ अधिकृत फेरीवाल्यांशिवाय अन्य फेरीवाले महापालिका हद्दीत व्यवसाय करू शकणार नाहीत.(प्रतिनिधी)(११ हॉकर्स झोनची यादी पान ४ वर.) हॉकर्स झोनच्या आखणीचे काममहापालिका हद्दीतील ११ हॉकर्स झोनचे आखणीचे काम शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे. महापालिकेतील सहाय्यक संचालक, नगररचना आणि बाजार परवाना विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नाने हॉकर्स झोनची आखणी होणार आहे. यात फेरीवाल्यांच्या चार चाकी हातगाड्यांसाठी जागा व अन्य आखणी होणार आहे. फेरीवाल्यांच्या सुविधेसाठीच महापालिकेने हॉकर्स झोन निश्चित केले आहेत. सर्व्हेक्षणानंतर कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्यांना ११ हॉकर्स झोनपैकी कुठेही व्यवसाय करण्याची मुभा आहे.- हेमंतकुमार पवार,आयुक्त, महापालिका.कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या फेरीवाल्यांनी हॉकर्स झोनमध्ये जाऊन व्यवसाय करावा. उर्वरित फेरीवाल्यांकरिता नव्याने ४० ते ४५ हॉकर्स झोन प्रस्तावित आहेत. त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल.- विनायक औगड,उपायुक्त, महापालिका
५०० फेरीवाल्यांसाठी ११ झोन निश्चित
By admin | Updated: July 17, 2016 00:02 IST