अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागांतर्गत हरिसालच्या वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. याप्रकरणी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला याला धारणी पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, विनोद शिवकुमार याच्या शारीरिक, मानसिक त्रासाची एकटी दीपाली याच बळी ठरल्या नाही, तर ४० महिला वनरक्षक आणि तीन महिला वनपालदेखील त्रस्त असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ला प्राप्त झाली आहे.
विनोद शिवकुमार बाला याच्याकडे गुगामल वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक पदाची जबाबदारी होती. हरिसाल, ढाकणा, तारूबांदा,चौराकुंड व चिखलदरा असे पाच रेंज त्याच्या अधिनस्थ होते. मात्र, मराठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सतत त्रास देत त्यांना कमी लेखणे ही त्याची कार्यशैली होती. विशेषत: महिला कर्मचाऱ्यांना असभ्य भाषेत बोलणे, ही बाला याची नित्याचीच बाब होती, असे ढाकणा, हरिसाल येथील काही महिला वनरक्षक, वनपालांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले. विशेष व्याघ्र दलाच्या महिला वनरक्षकांनासुद्धा मोठा त्रास होता. मोबाईल अथवा वायरलेसवर मॅसेज देताना कामे करूनसुद्धा प्रतिउत्तर देणाऱ्या महिला वनपाल, वनरक्षकांना तो ‘टार्गेट’ करायचा. महिला वनरक्षक या पायदळ जंगल भ्रमंती करतानाचे माेबाईलवर छायाचित्र पाठविल्यानंतरही ते मिळाले नाही, असे म्हणत पुन्हा जंगलात जा, गस्त घाला, कर्तव्याचे नव्याने छायाचित्र पाठवा, असा आग्रह धरून विनोद शिवकुमार बाला हा महिला वनकर्मचाऱ्यांंना शारीरिक व मानसिक त्रास देत होता. बाला याची दैनंदिनी डायरी, वाहनांचे लॉकबूक, विश्रामगृहाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले, तर दीपाली चव्हाण या महिला अधिकाऱ्यांसह अन्य महिला वनकर्मचारीसुद्धा किती त्रस्त होत्या, हे स्पष्ट होईल. परप्रांतीय अधिकारी हे मराठी महिला कर्मचाऱ्यांना शारीरिक, मानसिक त्रास देण्यासाठी महाराष्ट्र कॅडरमध्ये सहभागी होतात काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
---------------
बाला याचे रात्रीअपरात्री संरक्षण कॅम्पमध्ये दौरे
मेळघाटात अतिशय वादग्रस्त आणि उर्मट अशी शैली असलेल्या विनोद शिवकुमार बाला याची आता नवनवीन कार्यशैली समाेर येत आहे. चिखलदरा, ढाकणा आणि तारूबांदा येथील संरक्षण कॅम्पवर रात्री अपरात्री दौरे कशासाठी करण्यात आले, याचा सखोल तपास धारणी पोलिसांनी केला तर, बाला याच्यापासून वनकर्मचारी कसे त्रस्त होते, हे समोर येईल. एकाच भागात बाला याचे वारंवार दौरे कशासाठी हा मुद्दा पोलिसांनी निखंदून काढावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
-------------------
वाहनचालकाला ताब्यात घेऊन चौकशी करा
विनाेद शिवकुमार बाला याच्या दिमतीला असलेले शासकीय वाहनचालकाला ताब्यात घेतल्यानंतर बाला याचे दौरे कुठे आणि कशासाठी झालेत, हे समोर येईल, असे बोलले जात आहे. बाला याला शासकीय निवासस्थान असताना उशिरा रात्री विश्रामगृहावर कशासाठी मुक्काम असायचा, हे वास्तव वाहनचालक सांगू शकेल. विश्रामगृहाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले तर बाला याचे ‘दुध का दुध, पाणी का पाणी ’ झाल्याशिवाय राहणार नाही, अशी चर्चा जोर धरत आहे.
------------
दौऱ्यात सहायक वनसंरक्षक का नाही?
तारूबांदा, चौराकुंड, हरिसाल, चिखलदरा व ढाकणा या वनपरिक्षेत्रात उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार बाला हा दौरे करायचा. तेव्हा त्याच्यासमवेत सहायक वनसंरक्षक का राहत नव्हते, हा गंभीर सवाल आहे. खरे तर एखाद्या भागात उपवनसंरक्षकांना दौऱ्यावर जायचे असल्यास सहायक वनसंरक्षकांना सोबत नेणे अनिवार्य असते. मात्र, बाला हे एसीएफ यांना बायपास करून दौरा करायचा. एकट्याचा दौरा कशासाठी, हे स्पष्ट होईल.