अमरावती : सेवा सहकारी संस्थेची मतमोजणी आटोपल्यानंतर ग्रामपंचायत मतदारसंघात परिवर्तन पॅनेलने आघाडी घेताच समर्थकांनी जल्लोष केला. ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण केली. ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करीन आसमंत दणाणून सोडला. काही वेळाने परिवर्तन पॅनेलचे नेतृत्त्व करणारे माजी आमदार संजय बंड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे हे मतमोजणीस्थळी पोहोचताच समर्थकांमध्ये चैतन्य आले. संजय बंड यांना समर्थकांनी पेढे भरवून विजयाचा जल्लोष केला.अडते व्यापारी मतदारसंघातून विजयी झालेले सतीश अट्टल, प्रमोद इंगोले यांनीदेखील सर्मथकांसह विजय साजरा केला. हमाल- तोलारी मतदारसंघातून विजयी झालेले बंडू वानखडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव समर्थकांनी केला. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास मतमोजणीची प्रक्रिया पार पडली.१५ दिवसांपासून सहकार क्षेत्र ताब्यात घेण्यासाठी पक्षभेद बाजूला सारुन पॅनेलच्या माध्यमातून नेते एकदिलाने भिडले होते. यात सहकार पॅनेलचे नेतृत्त्व आ. यशोमती ठाकूर, काँग्रेसचे महासचिव संजय खोडके, बाजार समितीचे माजी सभापती विलास महल्ले, हरिभाऊ मोहोड यांचा समावेश होता. परिवर्तन पॅनेलची धुरा संजय बंड, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे तसेच तिसऱ्या आघाडीतील शेतकरी एकता पॅनेलचे नेतृत्त्व आ. रवी राणा, माजी खासदार अनंत गुढे, भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय, संयोगीता निंबाळकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष गजानन बोंडे यांनी केले. परंतु मतदारांनी परिवर्तन पॅनेलच्या बाजूने कौल देत आठ जागा या पॅनेलच्या वाट्याला दिल्यात.
घोषणांनी तहसील परिसर दुमदुमला
By admin | Updated: September 17, 2015 00:13 IST