अमरावती : अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे एक महिन्याच्या मानधनातून परस्पर कर्ज कपात केल्याने अंगणवाडी सेविका व मदतनीस आर्थिक संकटात सापडल्या आहेत. शहरी बाल विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत ३१५ सेविका व मदतनिसांचे मानधन संबंधित पतसंस्थेने कपात केले आहे. जिल्ह्यात हजारो अंगणवाडी सेविका व मदतनीस आपले कार्य जबाबदारीने पार पाडत आहेत. त्याकरिता प्रशासनाकडून अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी ४ हजार ५0 तर मदतनिसांना दोन हजार रुपये मानधन देण्यात येते. हे मानधन बालविकास प्रकल्प कार्यालयामार्फत त्या-त्या कर्मचार्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. या अंगणवाडी सेविका व मदतनिसांना स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षक सहकारी पतसंस्थेमार्फत कर्ज वाटप करण्यात आले होते. मात्र गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे १५७ अंगणवाडी सेविका व १५८ मदतनिसांनी कर्जाची परतफेड केली नाही. परिणामी अंगणवाडी सेविका व मदतनीस अशा ३१५ जणांचे ७६ हजार ९१४ रुपयांचे मानधन कपात करण्यात आले आहे. दर महिन्याला देण्यात येणार्या मानधनातून एकदम कर्जाची रक्कम कपात केल्याने अंगणवाडी सेविका व मदतनीस आर्थिक सकंटात सापडल्या आहेत. यामध्ये काही अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी कर्जाची परतफेड केल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र पतसंस्थेने थकबाकी काढून त्यांच्याही मानधनात कपात केली आहे. त्यामुळे पतसंस्था आपला मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी केला आहे. तुटपुंजा मानधनावर अंगणवाडी कर्मचारी सेवा देत आहेत. चिमुकल्यांच्या संगोपनासह त्यांच्या व त्यांच्या मातांच्या आरोग्याची जबाबदारी शासनाने त्यांच्यावर सोपविली आहे. यासह राष्ट्रीय कार्यात त्यांची सातत्याने मदत घेतली जाते. महिन्याकाठी त्यांना मिळणार्या मानधनाच्या भरोशावर त्या महिन्याभराच्या खर्चाचा हिशेब तयार करतात. (प्रतिनिधी)
मानधनातून कर्ज कपात
By admin | Updated: May 19, 2014 23:01 IST