अमरावती : जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या १७ वर्षीय मुलाचा आकस्मिक मृत्यू झाल्याने शोकविव्हळ, हताश आणि संतप्त माता-पित्यांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करून आक्रोश केला. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून संबंधित डॉक्टरला जाब विचारल्याने इर्विन रूग्णालय परिसरात काही वेळ गोंधळ आणि तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. ही घटना रविवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली. वाशीम जिल्ह्यातील सवड गावातील रहिवासी शुभम भार्गव भगत (१७) याला १२ मार्च रोजी इर्विनच्या वॉर्ड क्रमांक ६ मध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या तपासणीमध्ये त्याला ‘ड्युएशन मसक्युलर डिस्ट्रॉफी' हा दुर्धर आजार असल्याचे निष्पन झाले होते. डॉक्टरांनी रोगनिदानानंतर त्याच्यावर उपचार सुरु केले होते. परंतु त्यानंतर शुभमच्या छातीत कफ असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास शुभमची प्रकृती अचानक बिघडली. तेथील परिचारिकांनी तत्काळ कॉल करून त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पाचारण केले. काही वेळात वैद्यकीय अधिकारी ऋषिकेश नागलकर वॉर्डात पोहचले. त्यांनी शुभमवर तातडीने उपचारही सुरू केले. परंतु काही क्षणांतच शुभमचा मृत्यू झाला. काही वेळेपूर्वी चालत्या-बोलत्या असलेल्या शुभम्चा असा आकस्मिक मृत्यू झाल्याने त्याच्या पालकांना जबर धक्का बसला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच शुभम्चा मृत्यू झाल्याचा आरोप करीत त्यांनी रूग्णालयात गोंधळ घातला. प्रहारचे रोशन देशमुख यांनी लगेच रूग्णालयात भेट देऊन डॉक्टरांना झालेल्या प्रकाराबद्दल विचारणा केली. या घटनेमुळे इर्विनमध्ये खळबळ उडाली होती. परंतु डॉक्टर वेळेवर न पोहोचल्यामुळेच शुभमचा मृत्यू झाल्याचा आरोप प्रहारचे रोशन देशमुख यांनी केला आहे. (प्रतिनिधी)