शिक्षण विभागात तयारी : ‘लकी ड्रॉ’ची प्रतीक्षाअमरावती : शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के राखीव जागांवर पालकांना आॅनलाईन प्रवेशासाठीची मुदत २७ मे रोजी संपली आहे. अर्ज स्वीकृतीच्या अखेरच्या दिवसापर्यंत ३ हजार ७०० अर्ज सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे आता लकी ड्रॉ साठीची तयारी शिक्षण विभागाने सुरू केली आहे.आर्थिक दुर्बल वंचित घटकांतील मुलांना चांगल्या शाळेत शिक्षण मिळावे, याकरिता शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश प्रक्रियेची सुरुवात ४ ते २७ मे पर्यंत आरटीई प्रवेशासाठी जिल्हाभरातून जवळपास ३ हजार ७०० अर्ज शिक्षण विभागाकडे आले.शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन प्रवेशाकरिता अर्ज स्वीकृतीसाठी जिल्हाभरात मदत केंद्र कार्यान्वित केली होती. शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेत २०१६-१७ या शैक्षणिक सत्राकरिता आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहे. जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या खासगी विनाअनुदानित २२९ तर अल्पसंख्यक ३५ अशा एकूण २६४ शाळांची नोंदणी आरटीई प्रवेशासाठी करण्यात आली आहे. नर्सरी व पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत उपलब्ध जागेवर विद्यार्थ्याना प्रवेश दिले जाणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्याच्या पालकांनी प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रासह सुमारे ३ हजार ७०० आॅनलाईन अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्याची माहिती शिक्षण विस्तार अधिकारी किशोर पुरी यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. येत्या ३ किंवा ४ जून रोजी प्रवेशासाठी लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. ही नियोजित तारीख नसली तरी यावर प्राथमिक स्तरावर शिक्षण विभागाने एकमत दर्शविले असल्याने निश्चित तारीख ठरविल्यानंतर याबाबत पालकांना माहिती दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आता पालकांचे लकी ड्रॉ कडे लक्ष लागले आहे.या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेशविमुक्त आणि भटक्या जमाती, दारिद्र्यरेषेखालील बीपीएल, कुटुंब, इतर मागासवर्गीय एक लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेले कुटुंब, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व अपंग बालक यांना प्रवेशाकरिता अर्ज करता येणार आहे. यासाठी रहिवासी दाखला, वडिलाचे जातीचे प्रमाणपत्र, अपंगत्वाचे प्रमाणपत्र, कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला ही कागदपत्र जोडणे आवश्यक होते.लकी ड्रॉ नंतरहोणार प्रवेशआरटीई प्रवेशासाठी शहर आणि जिल्ह्यातून २७ मे पर्यंत अर्ज स्वीकारले आहेत. त्यानंतर अर्जांची पडताळणी केली जाणार असून २ किंवा ३ जून रोजी विद्यार्थ्याच्या लकी ड्रॉ प्रवेशासाठी काढला जाणार असल्याची माहिती आहे. तो पर्यंत पालकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.जिल्हा परिषद शिक्षण विभागाने आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागावर विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्जाकरिता प्रक्रिया राबविली ती आता पूर्ण झाली आहे. लवकरच विद्यार्थ्यांचा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.- एस.एम. पानझाडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक
आरटीई आॅनलाईन प्रवेशाची मुदत संपली
By admin | Updated: May 30, 2016 00:44 IST