लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : प्रकाश व्यवस्था, सुरक्षा कुंपणाचा अभाव, अस्वच्छतेचा कहरबडनेरा : नव्या वस्तीतील वरूडा व दलित, कुणबी स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाली आहे. स्मशानभूमी आहे की जंगल, असे दृश्य याठिकाणचे झाले आहे. महानगरपालिका प्रशासन व संबंधित नगरसेवकांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्या आहेत. नव्या वस्तीच्या राजेश्वर युनियन हायस्कूलजवळच वरूडा व दलित, कुणबी स्मशानभूमी आहे. या दोन्ही स्मशानभूमी लागूनच असून रस्त्यालगत वरूडा स्मशानभूमी, तर त्याच्या मागच्या बाजूला दलित व कुणबी या नावाने स्मशानभूमी आहे. या दोन्ही स्मशानभूमी प्रभाग क्रमांक ४२ मध्ये मोडतात. समोरच्या भागातील स्मशानभूमीची एक एकर जागा आहे. या स्मशानभूमीच्या ठिकाणी अंदाजे १५ ते २० लाख रुपयांचा निधी मागील दीड वर्षांपूर्वी वापरण्यात आलेला आहे, असे असतानादेखील या स्मशानभूमींची दयनीय अवस्था झाली आहे. वरूडा स्मशानभूमीला अर्धवट संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. यामुळे या स्मशानभूमीच्या सुरक्षेचा विषय समोर आला आहे. ज्या भागात निवारा, शेड व अंतिम संस्काराचे शेड आहे. त्याच्या अवतीभोवती झुडुपं वाढली आहेत. या स्मशानभूमीत लोक शौचाला बसतात. पाण्याची हापशी एका कोपऱ्यात बसविण्यात आली आहे. पथदिवे अनेकदा बंदच असतात. रात्री-अपरात्री अंतिम संस्कारासाठी जाणाऱ्यांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागतो. सरपटणाऱ्या प्राण्यांची भीतीदेखील वाढत आहे. स्मशानभूमीच्या स्वच्छतेवर भर देण्याची गरज आहे. शहरालगतच्या बऱ्याच स्मशानभूमीला बगिचासमान रुप आले आहे. वस्तीची लोकसंख्या मोठी आहे. या दोन्ही स्मशानभूमीचा वापर केला जातो आहे. प्रभाग क्रमांक ४२ चे नगरसेवक कांचन ग्रेसपुंजे व चंदुमल बिल्दानी यांनी स्मशानभूमीच्या स्वच्छतेवर लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.दलित, कुणबी स्मशानभूमी वनविभागाच्या जागेतवरूडा स्मशानभूमिच्या मागील बाजूला असलेली दलित व कुणबी स्मशानभूमी ही वनविभागाच्या जागेत असल्याची माहिती आहे. ११ हेक्टर ४७ गुंठे जागा असणाऱ्या वनविभागाच्या जागेतील काही भाग स्मशानभूमीसाठी द्यावा, असा जुना आदेश आहे. मात्र वनविभागाकडून त्याची पूर्तता होत नसल्यामुळे या स्मशानभूमिची दयनीय अवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष पुरविणे गरजचे आहे. वरूडा स्मशानभूमी कोणती व दलित, कुणबी स्मशानभूमी कोणती हे अद्यापही बडनेरावासीयांना प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे कळलेले नाही. लोकप्रतिनिधीने विकासासाठी निधी द्यावास्मशानभूमिचा कायापालट करण्यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता असते. वरूडा स्मशानभूमिचा पूर्णत: विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधीने निधी द्यावा, अशा प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे. त्याचप्रमाणे वनविभागाच्या जागेत असणाऱ्या दलित व कुणबी समाजाच्या स्मशानभूमिला वनविभागाकडून मोकळे करण्यासाठी प्रयत्न करावे.
स्मशानभूमी सोसतेय मरणयातना
By admin | Updated: September 15, 2015 00:18 IST