रक्षाबंधन विशेष
दोघांचा सांभाळ करीत देतेय अस्सल इंग्रजीचे धडे
भावांच्या शिक्षणाचीही वाहते काळजी,
फोटो - राऊत २१ ओ
रक्षाबंधन विशेष
मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : पहाटे ४ वाजता उठून प्रथम स्वतःचा अभ्यास, नंतर दोन्ही भावांच्या ब्रशपासून तर आंघोळ, त्यांना घास भरविणे, ऑनलाईन कॉलेज अशी सेवा करीत दोन्ही दिव्यांग लहान भावासाठी ती माई बनली आहे.
भाऊ-बहिणीचे नाते विणणारा धागा रक्षाबंधनाचा. रविवारी हा सण साजरा होत आहे. देव आणि दानवांमध्ये जेव्हा युद्ध सुरू झाले आणि दानव देवांवर आधिपत्य गाजवू लागले तेव्हा देवतांचा पराभव होत असल्याचे पाहून देवराज इंद्र ऋषी बृहस्पतींकडे गेले. बृहस्पतींच्या सांगण्यावरून इंद्राची पत्नी इंद्राणी म्हणजेच शचीने एक रेशीम धागा बांधला. परिणामी इंद्र विजयी झाले. योगायोगाने तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता. तेव्हापासूनच युद्धात विजयी होण्यासाठी आपल्या पतीला रक्षासूत्र बांधण्याची परंपरा सुरू झाली, असे मानले जाते.
तालुक्यातील वसाड येथे मोठी बहीण दोन्ही दिव्यांग भावांची सात वर्षांपासून सेवा करीत आहे. रक्षणकर्ती झाली आहे. स्नेहल असे तिचे नाव. शेतमजूर असलेले संजय गणपत साव यांना तिच्यासह तीन अपत्ये आहेत. सुहास हा १४ वर्षाचा मुलगा इयत्ता दहावीत शिकतो, तर धाकटा श्रवण (१२) हा नववीत कावली येथील लाभचंद मुलचंदूराठी विद्यामंदिरात शिकतो. सुहास बालपणी सुदृढ होता. मात्र आठ वर्षाचा होताच कमरेपासून दोन्ही पाय निकामी व्हायला सुरुवात झाली. चालणे बंद झाले आणि शेवटी खुर्चीचा आधार घ्यावा लागला. हाच प्रकार श्रवणबाबत घडला. हातावर आणून पानावर खाणाऱ्या साव कुटुंबाने दोन्ही मुलांवर उपचार केले. मात्र, काहीही उपाय झाला नाही.
ती माई बनून करते सेवा
घरची आर्थिक स्थिती गंभीर असल्याने संजय व कविता हे दाम्पत्य शेतमजुरीला जातात. त्यामुळे स्नेहल ही पहाटे उठून अकरावी आणि पुढील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते. त्यानंतर दोन्ही भावाच्या ब्रशपासून तर आंघोळ, जेवण देणे त्यांचा अभ्यास करून घेणे असे नित्यनेमाने करते. विशेष शिक्षक वैभव गवते हे या दोघांना घरी येऊन शिकवत असत. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मागील एक वर्षापासून त्यात खंड पडला. आता स्नेहल हीच त्यांची शिक्षिकादेखील झाली आहे.
--------------------
आमच्या घरी शेती नाही. दुसऱ्यांच्या शेतात मजुरीचे काम करून कुटुंबाचे पालन पोषण करावे लागते. त्यामुळे माझ्या दोन्ही मुलांचा दिवसभर सांभाळ स्नेहल करते. तिचा मोठा आधार आम्हाला आहे.
संजय साव, वडील