फोटो पी १७ मनपा फोल्डर
अमरावती : महापालिकेची सर्वसाधारण सभा सुरू असताना सभागृहात शिरून हलकल्लोळ माजविणाऱ्या युवा स्वाभिमानच्या दंडेलशाहीला ठेचा, त्यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी एकमुखी मागणी महापालिका पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली.
महापौर, उपमहापौरांसह सत्तापक्षातील नगरसेवकांसह विरोधी पक्षातील सर्व गटनेता, नगरसेवक यावेळी उपस्थित होते. मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास महापालिकेच्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांची भेट घेतली. कंत्राटी मनुष्यबळाच्या मुद्द्यावर युवा स्वाभिमानचे सुमारे ३०० कार्यकर्ते महापालिकेच्या विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात शिरले. त्यांच्या अर्वाच्च शेरेबाजीमुळे सभागृहात हलकल्लोळ उडाला. सर्वसाधारण सभा तहकूब करावी लागली. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा ही घुसखोरी झाली. ती लोकशाहीला काळिमा फासणारी असून, त्या कायकत्याविरूद्ध फौजदारी गुन्हे नोंदवावेत, तथा त्यांना अटक करावी, अशी मागणी महापालिका शिष्टमंडळाच्यावतीने पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्याकडे केली.
सर्वपक्षीय नगरसेवकांची एकजूट
महापौर चेतन गावंडे, उपमहापौर कुसूम साहू, पक्षनेता तुषार भारतीय, स्थायी समिती सभापती सचिन रासने, विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, गटनेता प्रशांत वानखडे, अब्दुल नाजिम, प्रशांत वानखडे, दिनेश बुब यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, प्रकाश बन्सोड, प्रशांत डवरे, सुनील काळे, धीरज हिवसे, अजय सारस्कर, अजय गोंडाने, राधा कुरील, आशिष अतकरे, राजेंद्र तायडे, सलिम बेग, अनिता राज आदींची उपस्थिती होती.