आ. बच्चू कडूंचे सूतोवाच : शिक्षकांना केले मार्गदर्शन अमरावती : मागील काही महिन्यापासून आंतरजिल्हा बदलीच्या प्रश्नावर अनेक आंदोलन केले जात आहेत. मात्र तरीही यावर तोडगा न निघाल्याने आता निर्णायक लढा उभारणार असल्याचे प्रतिपादन आमदार बच्चू कडू यांनी केले. ते रविवारी आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांच्या मार्गदर्शन मेळाव्याला संबोधित करतांना बोलत होते. जिल्हा परिषदेतील आंतर जिल्हा बदलीचे शेकडो प्रकरणे अद्यापही निकाली काढण्यात आलेले नाहीत. याशिवाय प्रशासकीय सोपस्कारही करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीसाठी मागील काही महिन्यापासून लढा शिक्षकांनी उभारला, एवढेच नव्हेतर प्रहार संघटनेने सुध्दा आंदोलने केली मात्र शासन व प्रशासनाला अद्यापही यश आले नाही. त्यामुळे हा प्रश्न विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात लावून धरणार असल्याचे आ.बच्चू कडू यांनी उपस्थित शिक्षकांना सांगितले. आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांना न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा दिलासाही मेळाव्यात कडू यांनी दिला. आ. कडू यांच्या उपस्थित प्रहार शिक्षक संघटनेची घोषणा उपस्थित शिक्षकांनी केली. यापुढे शिक्षकांचे विविध प्रश्नासाठी प्रहार शिक्षक संघटना काम करणार असल्याची घोषणा उपस्थित शिक्षकांनी केली. यावेळी कार्यक्रमाला आंतरजिल्हा बदली संघर्ष कृती समितीचे महेश ठाकरे, प्रहारचे जिल्हा प्रमुख छोटू महाराज वसू व शिक्षक बांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आंतरजिल्हा बदलीसाठी आता निर्णायक लढाई
By admin | Updated: July 18, 2016 01:22 IST