भागमभाग, कोरोनाची दहशत, धारणी वगळता बस फेऱ्या बंद
परतवाडा : अमरावती शहर व अचलपूर नगरपालिका परिक्षेत्रात सोमवारी रात्री ८ वाजतापासून लॉडाऊनचा आदेश जारी झाल्यानंतर सोमवारी दिवसभर येथील बाजारपेठेत ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांनी खरेदीसाठी चांगलीच गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्ते गदीरने फुलून गेले.
शनिवारी सायंकाळपासून बंद असलेली दुकाने सोमवारी सकाळी उघडताच चारही तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी मुख्य बाजारपेठ असलेल्या परतवाडा शहरात गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. येथील जयस्तंभ ते गुजरी बाजार चिखलदरा अंजनगाव स्टॉप, आठवडी बाजार, बस स्थानक परिसरात तोबा गर्दी होती.
बॉक्स
ग्रामीणच्या चिल्लर दुकानदारांची खरेदी
चिखलदरा, चांदूर बाजार, धारणी, भैसदेही या अचलपूर तालुक्याला लागून असलेल्या तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांसह किराणा, कटलरी, फळे, पालेभाज्या, अंडी व इतर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांनी लॉकडाऊनपूर्वी खरेदीसाठी परतवाडा शहर गाठले. आठवडाभराची खरेदी करून विविध वाहनांनी ते गावी जात असल्याचे चित्र दिसून आले.
बॉक्स
बस फेरी बंद
सोमवारी रात्री आठ वाजतापासून अचलपूर परतवाडा जुळ्या शहरात लॉकडाउन घोषित केल्याने येथील बस स्थानकातून पुढील आदेशापर्यंत धारणी तालुका वगळता जिल्हा बाहेर व जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाणाऱ्या तीनशेहून अधिक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे दररोज सहा लाख रुपयांचा तोटा परतवाडा बस स्थानकाला सहन करावा लागणार आहे. सोमवारी दिवसभर खासगी व एसटी महामंडळाच्या बसने ये-जा करणाऱ्यांची गर्दी मात्र दिसून आली.