लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. मात्र, जीवनावश्यक सेवा सुरळीत राहणार आहे. संकट अजून टळलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे. यशस्वीपणे मुकाबला करण्यासाठी आवश्यक दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सोमवारी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला पालकमंत्र्यांनी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, पोलीस अधीक्षक हरिबालाजी, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे आदी उपस्थित होते.नागरिकांनी रविवारी जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद दिल्याबाबत त्यांनी नागरिक, पोलीस, आरोग्य व इतर सर्व यंत्रणांचे अभिनंदन केले. असाच संयम व धैर्य यापुढेही दाखवणे आवश्यक आहे. आरोग्य यंत्रणेकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. स्वयंशिस्त घालून बाहेर पडणे टाळावे. आपली तसेच इतरांची दक्षता घ्यावी. वैद्यकीय सुविधा, दूध, भाजीपाला, किराणा, इंधन अशा जीवनावश्यक सेवा सुरळीत राहणार आहेत. त्यात कुठेही अडचण येणार नाही, यासाठी प्रशासनाने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.अमरावती कारागृहात मास्कनिर्मिती सुरू करण्यात आली. त्याचप्रमाणे, महिला बचत गटांकडूनही मास्कनिर्मितीचे काम तात्काळ सुरू करावे. आवश्यक आरोग्य सूचना वेळोवेळी प्रसारित करा. कंपन्यांना कामगार संख्या कमी ठेवण्यास व त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत, असे पालकमंत्री म्हणाल्या.ग्रामसेवक, पोलीसपाटलांकडून रोज आढावा घ्यास्वच्छता आणि पाणीपुरवठा सुरळीत राहील, याची दक्षता घ्या. ग्रामीण भागात फॉगिंग व आवश्यक तिथे टँकरची तयारी ठेवा. ज्यांना होम क्वारंटाइन सांगितले आहे, ते काटेकोरपणे होते का, त्याची खात्री करा. तालुक्याच्या ठिकाणी पेट्रोलिंग वाढवा. वेळोवेळी सूचना प्रसारित करा. ग्रामसेवक, पोलीस पाटील यांच्याकडून दैनंदिन अहवाल घ्या. आवश्यक तिथे नाकाबंदी करा. पशुपालक शेतकऱ्यांना पशुखाद्य मिळण्यात अडचणी येऊ नये. मात्र, दुकानांवर गर्दी होऊ न देण्याची दक्षता घ्या, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.संयम, शिस्त अन् दक्षता हवीनागरिकांनी रविवारी जनता संचारबंदी पाळून संयम व धैर्य दाखवले आहे. पोलीस, आरोग्य व इतर यंत्रणा चांगले काम करीत आहेत. संकट अजून टळलेले नाही. त्यामुळे यापुढेही स्वयंशिस्तीने गर्दी टाळावी. बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून तपासणी करून घ्यावी. आपल्यासह इतरांनाही सुरक्षित करावे. सर्वांनी मिळून शिस्त, संयम व दक्षतेतून या संकटाचा यशस्वी सामना करूया, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.
संकट टळलेले नाही यशस्वी मुकाबला करु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:01 IST
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला पालकमंत्र्यांनी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, पोलीस अधीक्षक हरिबालाजी, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे आदी उपस्थित होते.
संकट टळलेले नाही यशस्वी मुकाबला करु
ठळक मुद्देपालकमंत्री : नागरिकांनीही दक्ष राहून प्रशासनाला सहकार्य करावे