वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अवैध धंद्यावर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने धाड घालून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. जे अवैध धंदे वा त्याबाबत माहिती गुन्हे शाखेला मिळते, ती स्थानिक पोलिसांना का मिळू नये, त्यांना का मर्यादा येतात, असा प्रश्न तालुक्यात चर्चिला जात आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तालुक्यातील कारला येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून सुनील राक्षसकर (४१), मनोज राक्षसकर (२८) व मोहन राक्षसकर (२६, सर्व रा. भंडारज) यांना अटक केली असून, गजानन तायडे (रा.आकोट) हा पसार झाला. त्यांचेकडून ७९५० रुपये रोख, पाच मोबाईल असा एकुण ६६ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गत आठवड्यात अंजनगाव सुर्जी हद्दीतील शेतशिवारात अवैध देशी दारूची साठवणूक केल्याच्या माहितीवरून ४३ हजार ७५० रुपयांची अवैध दारू जप्त केली. गुन्हे शाखेचे पथक कारवाई करू शकते, तर अंजनगाव पोलीस का नाही, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.