राजकीय घडामोडींना वेग : इच्छुकांची पक्षनेत्यांकडे धावअमरावती : राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी नगपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच जिल्ह्यातील निवडणुकीसाठीचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षात मोर्चेबांधणीलाही वेग आला आहे.येत्या २७ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील ९ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूका होत आहे. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी थेट लढत होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, मोर्शी, वरूड, चांदुर बाजार, शेंदूरजनाघाट, धामणगाव रेल्वे, चांदूररेल्वे या नऊ नगरपरिषदांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी मागील महिन्यात नगराध्यक्षपदासह प्रभागाचे आरक्षण जाहीर होताच इच्छूक उमेदवारांनी संपर्क व राजकीय मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यातच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने इच्छुकांच्या हालचाली अधिक गतिमान झाल्या आहेत. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांची उमेदवारी मिळविण्याच्या दृष्टीने पक्षश्रेष्ठींकडे चकरा सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे राजकीय पक्षांकडे उमेदवारी मागणाऱ्यांची गर्दी बरीच वाढली असल्याने बडड्या नेत्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. अशातच नगरपरिषद निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांचे नेते कुठल्या पक्षाशी युती, आघाडी करतात याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झाले नाही. त्यामुळे सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप या प्रमुख राजकीय पक्षांसह इतरही पक्ष, आघाड्यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवारीसाठी सध्या चाचपणी सुरू असून राजकीय समीकरणे लक्षात घेऊनच आघाडी, युतीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता वर्तविली जात आहेत. तूर्तास महत्त्वाच्या राजकीय पक्षाची स्थानिक पातळीवर ‘एकला चलो रे’ची भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र वरिष्ठ पातळीवरून नगरपरिषद निवडणुकीतील युती-आघाडीबाबत कुठला निर्णय होतो, याकडेही सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि बसपा या प्रमुख पक्षांची उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची रस्सीखेच सुरू आहेत. त्यातही शिवसेना आणि भाजप हे राज्यस्तरावर सत्तेत असल्याने त्यांच्याकडे इच्छुकांचा अधिक ओढा आहे. (प्रतिनिधी)शिवसेना निवडणुकीसाठी सज्ज आहे. जिल्ह्यात पक्ष बांधणीसुद्धा भक्कम आहे. नगरपरिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने सध्या स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. मात्र पक्षप्रमुख आणि वरिष्ठ पातळीवर युतीबाबत जो निर्णय होईल, त्यानुसार जिल्ह्यातील रणनीती ठरवू. शिवसेना एकजुटीने आणि समन्वयातून निवडणुकीला सामोरे जाणार आहे.- संजय बंड, शिवसेना जिल्हाप्रमुख, अमरावतीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगरपरिषद निवडणुकीसाठी तयारी केली आहे. जिल्ह्यात पक्षासाठी पोषक वातावरण आहे. आघाडीबाबत वरिष्ठ स्तरावरून निर्णय घेण्यात येईल निवडणुकीत सर्वच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देईल. काँग्रेसशी आघाडीसाठी चर्चा केली जाणार आहे. मात्र त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणे अपेक्षित आहे. सध्यातरी राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने तयारीत आहे.- सुनील वऱ्हाडे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसजिल्ह्यात काँग्रेस पक्षाची ताकद भक्कम आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता सध्या तरी काँग्रेस पक्ष नगरपरिषदेच्या निवडणुका लढणार आहे. मात्र यासाठी वरिष्ठ पातळीवर काही निर्णय झाल्यासच बदल होऊ शकतात. अन्यथा स्वबळावर आमची तयारी झाली आहे. नगरपरिषद क्षेत्रात स्थानिक स्तरावर आवश्यकता भासल्यास आघाडी केली जातील. सर्वच ठिकाणी पक्षाचे उमेदवार राहतील- बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष ग्रामिण कॉंग्रेस कमेटीभाजपाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची तयारी मे महिन्यापासूनच केली आहे. सध्या स्वबळावर लढण्यासाठी पक्ष कार्यकर्ते सज्ज आहेत. निवडणुकीसाठी पक्षाला वातावरण पोषक आहे. युतीचा निर्णय हा धोरणात्मक आहे. यासाठी प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, त्यानुसार पुढील राजकीय निर्णय घेतला जाईल.- दिनेश सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष भाजपा
पालिका निवडणुकीसाठी काउंटडाऊन
By admin | Updated: October 19, 2016 00:16 IST