अमरावती : येथे आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या होळीच्या सणावर कोरोनाचे सावट यावर्षीदेखील आल्याने होळीचे रंग फिके होणार आहेत. गणेशोत्सवानंतर ग्रामीण भागात सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जाणारा होळीचा सण काही दिवसांवर आला असला तरी कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता यंदा देखील होळीचा सणावर मर्यादा येणार आहेत.
पारंपारिक धार्मिक रूढी या सणात अजूनही जोपासल्या जात असल्याने हा सर्वानाच हवाहवासा वाटतो. ग्रामीण भागातील ठिकाणी हा सण पाच दिवसाचा तर काही गावांमध्ये आठवडाभराचा साजरा करण्यात येतो. हा सण साजरा करण्यासाठी बाहेरगावी असणारे मेळघाटातील मजूर देखील मोठ्या प्रमाणात आपल्या गावी कुटुंबासह परत येत आहेत. त्यामुळे आदिवासी भागातील गावे देखील माणसांनी फुलून जात आहेत. मेळघाटात होळी सणा निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. या वर्षी होळीच्या सणाच्या तोंडावरच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याने होळी सणावर मर्यादा आल्या होत्या. अशातच कोरोनाचे संकट अद्याप दूर झाले नसल्याने यावर्षी देखील शासनाकडून सणावर मर्यादा आल्याने होळीचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी रंगाची उधळण करणाऱ्या होळीच्या सणातील रंग फिके पडणार आहेत.
बॉक्स
अनेकांच्या उत्साहावर विरजण
होळी संत जसा जवळ येत आहे. तसे तसा बच्चे कंपनी मध्ये आनंदाचे वातावरण असले तरी यावर्षीही कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने रंगपंचमीसाठी उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या बच्चेकंपनी मध्येही निर्बंधामुळे हिरमोड होणार आहे.