अमरावती : जिल्ह्यात रविवारी सहा कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने बाधितांच्या मृत्यूची संख्या ७११ झाली आहे. याशिवाय ४५५ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आतापर्यंत ५२,३७८ कोरोनाग्रस्तांची नोंद जिल्ह्यात झालेली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सकांच्या माहितीनुसार, डोंगरगाव खल्लार येथील ४६ वर्षीय महिला, राजहीलनगर येथील ५७ वर्षीय महिला, गोपालनगर येथील ७० वर्षीय महिला, जावरा कासेपूर येथील ६२ वर्षीय महिला, भीमवाडा, अमरावती येथील ४२ वर्षीय पुरुष व उरद, वरुड येथील ४० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात कोरोना चाचण्यांमधील पॉझिटिव्हिटी १० दिवसांनंतर पुन्हा वाढायला लागली आहे. रविवारी जिल्ह्यात ३१६४ चाचण्या झाल्यात. यामध्ये ४५५ पॉझिटिव्ह अहवालाची नोंद झाली. पॉझिटिव्हिटी १४.३८ टक्के व मृतांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे. चार दिवस केंद्रीय आरोग्य पथक जिल्ह्यात डेरेदाखल झालेले होते. त्यांनी महापालिका क्षेत्रासह जिल्हा ग्रामीण हॉटस्पॉट व तेथील आरोग्य यंत्रणेची पाहणी केली व आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाचा आढावा घेतला व महत्वाच्या टिप्स दिल्या आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी त्याच अवलंब कसा करणार, ही बाब वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची आहे.
बॉक्स
सद्यस्थितीत ३४९२ सक्रिय रुग्ण
उपचारानंतर बरे वाटल्याने रविवारी १०२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सद्यस्थितीत संक्रमणमुक्त नागरिकांची संख्या ४८,१७५ झालेली आहे, ही टक्केवारी ९१.९८ आहे. याशिवाय जिल्ह्यात ३,४९२ सक्रिय रुग्ण आहेत. यापैकी १,०९८ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहे. उर्वरित रुग्णांनी होम आयसोलेशन सुविधा घेतली आहे.