अमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेतील दोन अधिकाऱ्यांसह तीन कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे. अशातच गत आठवड्यापूर्वी झेडपीचे आरोग्य व वित्त समितीचे सभापती यांचे स्वीय सहाय्यक, सामान्य प्रशासनाचे डेप्युटी सीईओ यांच्यासह आरोग्य विभागातील भांडार विभाग, एनआरएचएम विभाग, आदी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. अशातच आता पाणी पुरवठा, रोजगार हमी योनजा विभाग, बांधकाम विभाग, आदी विभागांतील दोन अधिकारी व काही कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. परिणामी जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याशिवाय अमरावती पंचायत समितीमधील एका महिला अधिकाऱ्यांचासुद्धा काेरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हा परिषदेतील ज्या विभागातील अधिकारी व कर्मचारी कोरोना संक्रमित आढळून आले आहेत अशा विभागातील परिसर सॅनिटायझर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाकरिता शासन व प्रशासनाने सांगितलेल्या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.