अमरावती : १५ मेनंतर कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे चित्र आहे. पॉझिटिव्ह संख्या कमी आढळून येत असली तरी मृत्युसंख्येमुळे आरोग्य विभाग ‘अलर्ट’ झाला आहे. पहिल्या लाटेत नागरिक बिनधास्त वावरले. त्यामुळे दुसऱ्या लाटेचा प्रचंड फटका बसला. कोरोना अजूनही गेला नाही, संकट कायम आहे. नियमांचे पालन केले नाही, तर तिसरी लाट आल्याशिवाय राहणार नाही, असे संकेत आरोग्य यंत्रणेने दिले आहेत. कोरोना नियमांचे पालन हीच संसर्गापासून मुक्ती ठरणारी आहे.
राज्य शासनाने संचारबंदीचे निर्बंध शिथिल केले आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी मंगळवारी बाजारपेठेत प्रचंड गर्दी दिसून आली. जीवनावश्यक वस्तूंसह कापड, इलेक्ट्रिक साहित्य, तयार कापड, क्रॉकरी, पूजेचे साहित्य खरेदीसाठी एकच झुंबड उडाली होती. कोरोना गेला, असे गृहीत धरून नागरिकांनी बुधवारीदेखील गर्दी कायम ठेवली. अशीच सवय ठेवली, तर पहिल्या, दुसऱ्या लाटेपेक्षाही तिसऱ्या लाटेमुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने कोविड संदर्भातील आखून दिलेल्या त्रिसूत्री नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.
------------------
चार उपजिल्हाधिकाऱ्यांच्या २० पथकांची असेल नजर
१) शहरातील चौकाचौकात कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध ही पथके दंडात्मक कारवाईसह दुकाने मर्यादित वेळेत सुरू राहतील, याची दक्षता घेणार आहेत.
२) संचारबंदीत शिथिलता ही रोजगार व व्यवसाय ठप्प पडू नये, यासाठी सकारात्मक निर्णय आहे. त्यामुळे नियमावलींच्या पालनाकडे हे पथक लक्ष देणार आहे.
३) सकाळी ७ ते २ या दरम्यान प्रतिष्ठाने, दुकाने सुरू राहणार असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन या पथकांकडून करण्यात येणार आहे.
४) सार्वजनिक स्थळी नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क न वापरल्यास ७५० रुपये दंड या पथकांकडून आकारले जाणार आहे.
५) पथकांच्या धाडसत्रात दोन ग्राहकांत तीन मीटरचे अंतर दिसून न आल्यास सदर दुकाने सील करून ३५ हजारांचा दंड वसूल करण्यात येणार आहे.
------------------
- एसटी, रेल्वेने बाहेरगावी अनावश्यक प्रवास टाळावा.
- मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर, शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचे पालन करणे बंधनकारक
- बाजारपेठेत वस्तू, खरेदी करताना शारीरिक अंतर राखण्याची स्वयंशिस्त पाळावी
- ताप, सर्दी, खोकला असल्यास डॉक्टरांच्या सल्लानुसार कोरोना चाचणी करावी.
- जीवनावश्यक वस्तू, साहित्य खरेदीच्या नावे गर्दी करू नये
--------------------
पहिला अनलॉक
४ ऑगस्ट २०२०
एकूण कोरोना रुग्ण : ९०
मृत्यू : ३
बरे झालेेले रुग्ण : २४२
--------------
दुसरा अनलॉक
१ जून २०२१
एकूण कोरोना रुग्ण : ३३८
मृत्यू : ७
बरे झालेेले रुग्ण : ७२४