नेरपिंगळाई : ऑगस्ट २०२० मध्ये गाव कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा ११ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान १३ कोरोना संक्रमित नेरपिंगळाईत आढळून आले. यामध्ये पाच पुरुष व आठ महिला आहेत. याशिवाय ८५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. काही कोरोना संक्रमितांना कोविड सेंटरला दाखल केले, तर काहींना गृह विलगीकरणामध्ये ठेवले आहे.
कोरोनामुक्त झालेल्या गावात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाल्याने नागरिकांना अतिदक्ष राहण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. तिरपुडे व आनंद मोरे, पोलीस पाटील राजेश राऊत, ग्रामसचिव विनोद मनवर यांनी केले आहे.
दरम्यान, गावात फवारणी करणे, स्वच्छता अभियान राबविणे, जनजागृती करणे, रुग्ण वाढल्यास त्यांची शाळेत विलगीकरणाची सोय करणे, गुरुवार आठवडी बाजार बंद ठेवण्यात येईल. शासनाच्या नियमांचे कुणी उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. ग्रामपंचायतीमार्फत या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती सरपंच सविता खोडस्कर यांनी ‘लोकमत’ला दिली.
--------