लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात आठवडाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. ही स्थिती लोकांसाठी दिलासादायक ठरणारी असली तरी कोरोनाने मृत्यूचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. जिल्ह्यात १५ दिवसांत कोरोनाचे १२,५७८ रुग्ण आढळले, तर २५६ रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, आठवडाभराचा विचार केला तर सात दिवसांत ४,७७६ रुग्ण आढळले, ९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गत आठवड्यात ही रुग्णसंख्या तब्बल ३,०२४ ने कमी झालेली आहे, तर मृत्यूदेखील ५८ कमी झालेले आहे. मात्र, मे महिन्यात कोरोनाने बळी जाणाऱ्यांची संख्या वाढतीवरच आहे. जिल्ह्यात तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात लहान बालकांसाठी ६० बेडचे एक रुग्णालय उभारण्यात येणार असून, यासोबतच जिल्ह्यात खासगी तीन बाल रुग्णालयांना कोविड उपचारासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात आता रुग्णालयातील रुग्णांची संख्यादेखील कमी होत आहे. एकेकाळी रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले होते. आता मात्र खासगी व शासकीय रुग्णालयांतही अनेक बेड रिकामे आहेत. जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू असून, इतर सर्व बाजारपेठा मात्र बंद असल्याने व्यापाऱ्यांचे तसेच मजुरांचे हाल होत आहेत. १ जूननंतर पुन्हा लॉकडाऊन लागल्यास व्यापारी व मजूर वर्गाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.राज्य शासनाने १ जूनपासून पुन्हा पंधरा दिवस संचारबंदी वाढविण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी कोणती नियमावली लागू होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. मात्र व्यापारी, उद्योजक, कामगार, मजूर वर्ग, दुकानदार संचारबंदीच्या विरोधात असल्याचे चित्र आहे.
आता जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. पुढच्या आठवड्यात आणखी रुग्ण कमी होतील, अशी आशा आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी