अवघ्या बारा दिवसांत कोरोना संक्रमितांचे शतक पूर्ण : आपत्ती व्यवस्थापनाची आज तातडीची बैठक
परतवाडा : लगतच्या देवमाळी ग्रामपंचायत अंतर्गत अवघ्या बारा दिवसांत कोरोना संक्रमित रुग्णसंख्येने शतक पूर्ण केले आहे. नरेश बलिंगे (५०, रा. देवमाळी) या कोरोना संक्रमित वकिलाचा उपचारादरम्यान अमरावती येथे मृत्यू झाला.
देवमाळीतील परिस्थिती स्फोटक बनली आहे. दररोज कोरोना संक्रमित रुग्ण चाचणीत निष्पन्न होत आहेत. २५ फेब्रुवारीला एकच दिवसात देवमाळीत १७ कोरोना संक्रमित निघाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्या पार्श्वभूमीवर देवमाळी ग्रामपंचायतीने २७ फेब्रुवारीला तातडीची सभा बोलावली आहे. स्फोटक परिस्थितीच्या अनुषंगाने संपूर्ण देवमाळी सील करण्यावर या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. या बैठकीतील निर्णय उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना कळविला जाणार आहे.
दरम्यान, देवमाळीत वास्तव्यास असलेले वकील नरेश बलिंगे चार दिवसांपासून आजारी होते. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. अमरावती येथील खासगी कोविड रुग्णालयात त्यांच्यावर औषधोपचार सुरु होते. तेथेच त्यांचा मृत्यू झाला. देवमाळी येथे कुटुंबेच्या कुटुंबे कोरोना संक्रमित निघत आहेत. रुग्णालयात दाखल असल्याने काही घरांना टाळे लागले आहे. येत्या दोन दिवसांत देवमाळीत कोरोना चाचणी शिबिर घेऊन दुकानदारांसह सर्वांचीच चाचणी करवून घेण्याचे प्रयत्न असल्याची माहिती देवमाळी येथील ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थान समिती सचिव प्रताप पाटील यांनी दिली. देवमाळी ग्रामपंचायत क्षेत्र परतवाडा शहराचाच एक भाग असून, तेथील वास्तव्यास असलेल्यांचा संबंध थेट परतवाडा शहराशी येतो. त्यामुळे परतवाडा शहरासंबंधी काळजी घेणे प्रशासनाकरिता गरजेचे झाले आहे.
कोट
रुग्णांनी आजार अंगावर काढू नये. तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत. कोरोना चाचणी करून घ्यावी. त्यासंबंधी माहिती ग्रामपंचायतला द्यावी. कोरोना त्रिसूत्रीसह कोविड नियमावलीचे पालन करावे. स्वत:सोबतच दुसऱ्यांची काळजी घ्यावी.
- पद्मा सोळंके,सरपंच, देवमाळी ग्रामपंचायत