पान २ ची बाॅटम
चांदूर रेल्वे : येथे कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरात प्रशासनातर्फे आयोजित शिबिरात लसीकरण सुरू असताना शुक्रवारी मध्येच लस संपल्याने अनेक नागरिक लस न घेताच परतले. त्यामुळे शासन, प्रशासनाकडून ‘गो कोरोना’चे पाढे वाचले जात असताना कोरोना जाईल कसा, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यानंतर सगळीकडे कोरोना लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आतापर्यंत चांदूर रेल्वे तालुक्यात आमला, घुईखेड, आमला उपकेंद्र, जवळा (धोत्रा) उपकेंद्र, राजुरा उपकेंद्र, सातेफळ उपकेंद्र, मांजरखेड, पळसखेड (पीएससी), चांदूर रेल्वे शहरातील ग्रामीण रुग्णालय, सरस्वती शाळा, नेहरू शाळा व जि. प. शाळा या सेंटरवर ४,३५४ नागरिकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले. मात्र, आता लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. चांदूर रेल्वे शहरात शुक्रवारी जिल्हा परिषद शाळेत लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते. ध्वनीक्षेपकाव्दारा लसीकरणाचे आवाहनसुध्दा करण्यात आले होते. यानंतर अनेक नागरिक लस घेण्यासाठी शिबिरस्थळी पोहचले होते व रांगेत असतानाच लस संपल्यामुळे त्यांना परतावे लागले. यावरून प्रशासनाचे योग्य नियोजन नसल्याचे चित्र पहावयास मिळाले.
लसीचा पुरवठा होताच पुन्हा लसीकरण
चांदूर रेल्वे तालुक्यात कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाला असून लसीचा पुरवठा होताच पुन्हा लसीकरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी रवींद्र कोवे यांनी दिली.
असे झाले लसीकरण
आमला- ४८५, घुईखेड - ५७०, आमला उपकेंद्र - ३६२, जवळा (धोत्रा) - १८०, राजुरा - ५०, सातेफळ - ८४, मांजरखेड - ४१, पळसखेड - ५२९, ग्रामीण रुग्णालय, चांदूर रेल्वे - १७३९, सरस्वती शाळा, चांदूर रेल्वे - ९६, नेहरू शाळा, चांदूर रेल्वे - ११८, जि. प. शाळा, चांदूर रेल्वे - १०० एकूण - ४३५४ झाले.